आघाडीची ई-पेठ असलेल्या फ्लिपकार्टने गुरुवारी क्लीअरट्रिप या आघाडीच्या ऑनलाइन सहल तंत्रज्ञान कंपनीवर १०० टक्के मालकी मिळवत असल्याची घोषणा केली. ग्राहकांसाठी डिजिटल व्यापार सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी कंपनी येत्या काळात अधिकाधिक गुंतवणूक करणार आहे.

या संबंधाने झालेल्या करारातील शर्तींनुसार, क्लीअरट्रिप ही स्वतंत्र नाममुद्रा अस्तित्वात राहील, मात्र त्या कंपनीचे संपूर्ण परिचालन फ्लिपकार्टकडून ताब्यात घेतले जाईल. क्लीअरट्रिपचा विद्यमान सर्व कर्मचारीवर्गही कायम ठेवला जाईल, असे फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

विविध व्यवसायांमध्ये विस्तार आणि विकासाच्या नव्या संधी शोधत असतानाच या गुंतवणुकीमुळे  ग्राहकांना अधिक वैविध्यपूर्ण सेवांची श्रेणी उपलब्ध करून देता येईल, असा विश्वाास कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केला. ग्राहकांसाठी प्रवास आणि सहलींचे नियोजन अधिक सोपे व सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात्मक उपाययोजना विकसित करण्यासाठी क्लीअरट्रिपमध्ये अधिक गुंतवणूक केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या व्यवहारांमागील वित्तीय व्यवहार उभयतांकडून सांगण्यात आला नाही, तर या अधिग्रहण व्यवहाराची पूर्तता सर्व संबंधित नियामक मंजुऱ्या, परवानग्या मिळविल्यानंतर मार्गी लागेल.