जोखीमरक्षणाचा कृती आराखडा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दायित्व ठरविणे बंधनकारक

देशातील सर्वात मोठय़ा बँक घोटाळ्याचा घाव ताजा असताना, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांनी वाढत्या कार्यात्मक आणि तांत्रिक जोखमींचा सामना करण्यासाठी अग्रिम कृती योजना तयार करावी आणि त्याचे उत्तरदायित्व बँकेच्या वरिष्ठ कार्यपालकांवर निश्चित करावे, असे फर्मान केंद्रीय अर्थमंत्रालयाने मंगळवारी काढले.

बँकांचे कार्यकारी संचालक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांना वाढत्या जोखमींच्या मुकाबल्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी दिली. मंगळवारी सकाळी ट्वीट करून त्यांनी हे दक्षतेचे उपाय स्पष्ट केले.

संभाव्य धोक्यांना पूर्वनिश्चित करून तयार केल्या जाणाऱ्या कृती आराखडय़ासाठी १५ दिवसांची मुदत दिली गेली आहे. बँकांच्या परिचालनातील जोखीमप्रवण कमजोऱ्या आणि उणीवा ओळखा, सवरेत्कृष्ट व्यवहार पद्धती जाणून घेऊन त्यासाठी तंत्रज्ञानात्मक उपायांची आखणी करा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुस्पष्ट उत्तरादायित्वाचे निर्धारण अशा गोष्टी या आराखडय़ात सामावण्याच्या सूचना असल्याचे कुमार यांनी सांगितले.

प्रत्येक सरकारी बँकेत कार्यकारी संचालक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांच्या नेतृत्वातील संघाकडून बँकिंग क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास केला जाईल आणि त्यानुसार आपल्या विद्यमान रचनेतील नेमक्या उणिवा निश्चित केल्या जातील. किमान स्वीकारार्ह कार्यप्रणालीचे मानके कोणती आणि त्यांची अंमलबजावणी ही तंत्रज्ञानात्मक उपाययोजनांसह कशी केली जाऊ शकेल, याचा उल्लेखही या दोन अधिकाऱ्यांकडून तयार केल्या जाणाऱ्या कृती आराखडय़ात असावा, असेही सुचविले गेले आहे.

बँकांच्या संचालक मंडळाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अनुपालन अहवालाची अंमलबजावणी करताना, जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. त्यांचे पालन होते की नाही हे पाहून त्या त्या अधिकाऱ्यांचे सुस्पष्ट दायित्वही निश्चित करण्याच्या बँकांना सूचना दिल्या गेल्या आहेत.

दरम्यान पंजाब नॅशनल बँकेतील उघडकीस आलेल्या घोटाळा वाढून सुमारे १२,७०० कोटी रुपयांवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तर बँकांतील घोटाळ्याची एकूण रक्कम २० हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

आता सर्वच मोठय़ा बुडीत खात्यांचा सीबीआयकडून तपास

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील ५० कोटींपेक्षा अधिक कर्जरकमेच्या सर्वच बुडीत खात्यांबाबत संभाव्य घोटाळे-गैरव्यवहाराच्या दृष्टीने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून तपास करून खातरजमा केली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने तसे आदेश मंगळवारी दिले. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा वाढून सुमारे १२,७०० कोटी रुपयांवर गेल्याचे स्पष्ट झाल्याच्या पाश्र्वभूमीवर हे आदेश देण्यात आले. पीएनबीपाठोपाठ रोटोमॅक समूह आणि सिम्भोली शुगर्ससारखे कर्ज-घोटाळेही पुढे आले असल्याकारणे सरकारी बँकांनी सर्वच संशयित कर्ज खाती तपास यंत्रणाकडे सोपावावीत आणि बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अशी खाती हेरावीत, असे सरकारचे फर्मान असल्याचे केंद्रीय वित्तीय सेवा सचिव यांनी स्पष्ट केले. सीबीआय, सक्तवसुली संचालनालय (ईडी), महसूली गुप्तचर संचालनालय या तपास यंत्रणा  तसेच पीएमएलए, फेमा आणि आयात-निर्यातविषयक नियमांची तत्परतेने मदत घेतली जावी, असे सूचित केले गेले आहे.

मोदीच्या कंपनीचा अमेरिकेत दिवाळखोरीचा दावा

बँक घोटाळ्याचा फरार आरोपी नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय आभूषण व्यवसायाची कंपनी फायरस्टार डायमंड इन्क.ने अमेरिकेत दिवाळखोरी दावा दाखल केला आहे. न्यूयॉर्कच्या दिवाळखोरी न्यायालयात ही ‘चॅप्टर ११’ याचिका सोमवारी दाखल केली गेली. फायरस्टार डायमंडचे अमेरिका, युरोप आणि आखाती देशांसह भारतात व्यावसायिक जाळे असून, रोकडीची चणचण आणि पुरवठा साखळीला मर्यादा पडल्याने हा व्यवसाय चालविणे आव्हानात्मक बनले असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. न्यायालयात दाखल याचिकेत कंपनीने १० कोटी अमेरिकी डॉलरची मालमत्ता आणि कर्जदायित्व असल्याचे नमूद केले आहे.

मोदी-चोक्सी यांचा घोटाळा एकूण १२,७०० कोटींवर

  • १३२३ कोटींचा आणखी एक घोटाळा उघड

पंजाब नॅशनल बँकेतील मेहुल चोक्सी व नीरव मोदी यांचा १,३२३ कोटींचा नवा घोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे आता या घोटाळ्याची एकूण रक्कम १२,७१७ कोटी म्हणजे दोन अब्ज अमेरिकी डॉलर झाली आहे. आधी हा घोटाळा ११३९४.०२ कोटी रुपयांचा  होता.

पंजाब नॅशनल बँकेच्या २०१७ या वर्षांतील निव्वळ नफ्याइतकी म्हणजे १३२० कोटी रुपयांच्या या नव्या घोटाळ्याबाबत सोमवारी रात्री बँकेने शेअर बाजारांना माहिती दिली. बँकेकडून दिली गेलेली नवी हमीपत्रे सापडली असून ती परदेशातील बँकांना दिल्याचे समोर आले आहे. यातून आणखी २०.४ कोटी डॉलरचा (१३२० कोटी रुपये)  गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे. गैरव्यवहारात बुडालेले पैसे सरकारने भरून देण्यास सांगितल्याचा बँकेने इन्कार केला आहे. आताची हमीपत्रेही मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेने नीरव मोदी समूह व गीतांजली समूहातील कंपन्यांना दिली गेली होती; त्याबदल्यात परदेशातील भारतीय बँकांतून पुरवठादारांना कर्ज देण्यात आले. कर्जदारांनी पैसे न फेडल्याने परदेशातील बँकांनी पंजाब नॅशनल बँकेकडे हमी रक्कम मागितल्याने हा घोटाळा उघड झाला आहे.