नवी मुंबईमध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून मागील काही काळापासून मोठा वाद निर्माण झालेला असतानाच काही आठवड्यांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने नवी मुंबई विमानतळाचे जीव्हीकी एअरपोर्ट डेव्हलपर लिमिटेड या कंपनीकडे असणारे ५०.५ टक्के समभाग अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडला देण्यास परवानगी दिली. मलाकी हक्कातील बदलांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यत देण्यात आल्याने नवी मुंबई विमानतळाचा कारभारही अदानी समुहाकडेच असेल यावर शिक्कामोर्तब झालं. मात्र नवीन विमानतळांसंदर्भातील कंपनीच्या धोरणांवर कंपनीचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज पार पडलेल्या अदानी समुहाच्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये माहिती दिली.

नक्की वाचा >> Adani AGM : गौतम अदानी म्हणतात, “आम्ही पीएम केअर्स फंडमध्ये योगदान दिले असले तरी…”

अदानी समुहाने मागील वर्षभरामध्ये केलेल्या कामगारीची आकडेवारी सांगताना गौतम अदानी यांनी विमानतळासंदर्भातील कंपनीच्या कामगिरीसंदर्भात सांगितलं. “अदानी एन्टरप्राइजेस या कंपनी मार्फत समूहाने विमानतळ विकास या क्षेत्रात पाउल ठेवले आहे आणि आता भारतातील प्रत्येक चार प्रवाशांपैकी एक प्रवासी हा अदानी विमानतळावरून उड्डाण करतो. जगातल्या कुठल्याही देशात एखाद्या विमानतळ कंपनीने एकूण प्रवासी वाहतुकीपैकी २५ टक्के हिस्सा मिळवलेला नाही.  कंपनीने नुकतेच अहमदाबाद, लखनौ आणि मंगलोर विमानतळांवर ताबा मिळवला आहे. तसेच कंपनीने गुवाहाटी, जयपूर आणि तिरुअनंतपुरम या विमानतळांसाठी सवलत करारांवर सह्या केलेल्या आहेत.  या शिवाय कंपनीकडून मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाचा ताबा मिळवण्याची प्रक्रिया सुरु आहे. कंपनीकडून संपूर्ण भारतभर विमानतळाचे जाळे उभारण्याबरोबरच, प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्प्नशिवाय इतर स्रोतातून उत्त्पन्न मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधून निर्माण होणाऱ्या शक्यता सुद्धा कंपनीकडून तपासून पहिल्या जात आहेत,” असं गौतम अदानी विमातळ उद्योगाबद्दल बोलताना म्हणाले.

नक्की वाचा >> …म्हणून शेअर बाजारात कंपनीला एका दिवसात ५४ हजार कोटींचा फटका बसला; गौतम अदानींचा खुलासा

अदानी पोर्ट्स आणि एसइझेड ही कंपनी स्वतःला फक्त बंदर व्यवसायात कार्यरत असलेल्या कंपनीमधून एकीकृत अशा बंदर आणि लॉजिस्टिक कंपनीत परावर्तित करत आहे.  २०२१ हे आर्थिक वर्ष कंपनीच्या दृष्टीने सर्वार्थाने महत्वपूर्ण ठरले आणि कंपनीने या काळात महत्वपूर्ण टप्पा गाठला. कंपनीने या काळात भारतातील बंदरावरून हाताळल्या गेलेल्या मालापैकी २५ टक्के हिस्सा मिळवला तर कंटेनर विभागात कंपनीचा हिस्सा ४१ टक्के इतका राहिला. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये या काळात एलएनजी आणि एलपीजी हाताळणी व्यवसायाचा समावेश करून विविधीकरणाला गती दिली. तसेच धर्मा बंदरातूनही  एलएनजी व्यवसाय हाताळणीची सुरवात केली. जगातील दुसरी कोणतीही कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणात बंदर व्यवसायात कार्यरत नाही, असं गौतम अदानींनी सर्वसाधारण वार्षिक सभेमधील भाषणात सांगितलं.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचे भवितव्यच बदलत आहे. २०२० मध्ये ही  कंपनी जगातील सौर ऊर्जा निर्माण करणारी सर्वात मोठी कंपनी बनली आणि हे या कंपनीने फक्त पाच वर्षात साध्य केले. गेल्या महिन्यात एसबी एनर्जीच्या सम्पादनानंतर या कंपनीने पाच गिगावॅट अपारंपरिक ऊर्जेचा पोर्टफोलिओ ताब्यात घेतला.  हि कंपनी ३.५ अब्ज डॉलरला ताब्यात घेण्यात आली.  यामुळे २५ गिगावॅटची क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य मुदतीच्या चार वर्ष आधी पूर्ण करण्यात आले. जागतिक स्तरावर कुठल्याही दुसऱ्या कंपनीने इतक्या वेगाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला नाही, असं गौतम अदानी म्हणाले.

नक्की वाचा >> “…अदानींसोबत हवेत उडणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत”; मोदींचा फोटो शेअर करत नेत्याची टीका

२०२१ या आर्थिक वर्षासाठी सूचिबद्ध कंपन्यांचे व्याज, कर, घसारा आणि परिशोधन (अमोर्टिझशन) एकत्रित उत्पन्न हे ३२,००० कोटी इतके होते, मागील आर्थिक वर्षापेक्षा २२% वाढ या कंपन्यांनी उत्पन्नात नोंदवली. अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या समभागांनी १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला. जवळपास ९ हजार ५०० कोटी रुपयाचा परतावा समभागधारकांना देण्यात आला. कंपन्यांचा करोत्तर नफा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १६६ टक्क्यांनी वाढल्याचं गौतम अदानी म्हणाले.

सध्या अदानी समूह बंदर, विमानतळ, लॉजिस्टिक, नैसर्गिक संसाधने, औष्णिक आणि अपारंपरिक वीज उत्पादन, पारेषण, वितरण, डेटा सेंटर, संरक्षण, बांधकाम, शहरी वायू वितरण आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत आहे.  यातील प्रत्येक क्षेत्र हे जलद गतीने वाढत आहे, याशिवाय या प्रत्येक क्षेत्राचा एकमेकांशी निकटचा संबंध आहे. तसेच भविष्यात आपण ज्या क्षेत्रात प्रवेश करणार आहोत त्यांचा हि या क्षेत्रांशी निकटचा संबंध असणार आहे, असं गौतम अदानींनी कंपनीच्या गुंतवणूकदारांना सांगितलं.