खर्चातील कपातीचे कारण पुढे करत अदानी समूहाने तिचे ऑस्ट्रेलियातील खनिकर्म कंत्राट अखेर रद्द केल्याचे पाऊल उचलले आहे. समूहाला मिळालेले कर्ज वादग्रस्त ठरल्यानंतर अदानीने २.६ अब्ज डॉलरचे कंत्राट रद्द केले आहे. भारतातील आघाडीचा ऊर्जा, बंदर उद्योग समूह असलेल्या अदानीकडून ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे खनिकर्म प्रकल्प राबविला जात आहे. वादग्रस्त कार्मिकेल कोळसा प्रकल्प हा समूहाला मिळालेल्या कर्जामुळे चर्चेत आला होता. समूहाला सवलतीत कर्ज दिले गेल्याचा आक्षेप घेतल्यानंतर समूहाविरुद्ध विरोधासाठी तीव्र निदर्शनेही झाली. या भागात कंपनीचा एकूण १६.५ अब्ज डॉलरच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. अदानी समूहाला स्थानिक नवनियुक्त क्वीन्सलँड सरकारने धक्का दिला आहे. परिसरात प्रकल्पासाठी रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी देण्यात आलेल्या ९० कोटी डॉलर कर्जाकरिता स्थानिक सरकारने गेल्या आठवडय़ात मनाई केली होती. अ‍ॅनासॅशिया पॅलेस्झुक यांनी सत्तेत आल्यानंतर अदानीच्या प्रकल्पाला पहिल्याच दिवशी स्थगिती देण्याचे आदेश निवडणुकीत दिले होते.