विमानतळ व्यवस्थापनातील सर्वात मोठा समूह म्हणून स्थान

मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी समूहाने व्यवस्थापकीय नियंत्रण मिळवले आहे. अदानी समूहातील अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने देशातील दुसऱ्या व्यस्त विमानतळाचे हे अधिकार जीव्हीकेकडून घेतले आहेत.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा ७४ टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला ५०.५ टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी २३.५ टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, असे या संबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

अदानी समूहाने बोली प्रक्रियेत विजय मिळवलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम येत्या महिन्यात सुरू होणार आहे. मुंबईनजीकचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानीच्या नेतृत्वाखाली २०२४ पर्यंत अस्तित्वात येईल.

अदानीच्या ताफ्यात सध्या देशातील सहा विमानतळाचे व्यवस्थापन आहे. समूहाचा आता हवाई प्रवासी वाहतुकीमध्ये २५ टक्के तर हवाई माल वाहतूक क्षेत्रात ३३ टक्के हिस्सा झाला आहे. मार्च २०२२ अखेपर्यंत कंपनीचा हवाई प्रवासी वाहतूक हिस्सा सध्याच्या ८ कोटी प्रवाशांवरून १० कोटी प्रवासी होईल, असा विश्वास अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्यक्त केला आहे.