मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) या पश्चिाम व पूर्व मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या वीज वितरण कंपनीने सर्व ग्राहकांना नूतनीय ऊर्जेसंबंधी त्यांचे लक्ष्य व महत्त्वाकांक्षा सुलभ मिळविण्यासाठी ‘मुंबई-ग्रीन दर पुढाकार’ हा उपक्रम सादर केला आहे.

विमा नियामक ‘एमईआरसी’च्या मंजुरीनुसार आस्थापना, उद्योग, व्यावसायिक, हॉटेल्स व रेस्तरां तसेच निवासी अशा सर्व ग्राहकांना हरित ऊर्जेचा पर्याय स्वीकारता येणार आहे. हा पर्याय तात्काळ येणाऱ्या देयक चक्रासह स्वीकारता येणार असून ग्राहकांना त्याद्वारे हरित ऊर्जा प्रमाणपत्र दरमहा मिळेल. ‘हरित ऊर्जा दर’ या संकल्पनेवरच त्यांना हिरव्या रंगाचे देयक मिळेल.

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांसाठीच्या हरित दर पुढाकाराच्या पर्यायाबाबत एईएमएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘अदानी इलेक्ट्रिसिटी हरित ऊर्जा दर पुढाकार कंपन्या व अन्य ग्राहकांना जबाबदार नागरिक होण्याची संधी देत आहे. शाश्वात लक्ष्य मिळविण्याच्या दृष्टीने ग्राहकांचे महत्त्वाचे योगदान हे एक संकल्पक पाऊल असेल.’

एईएमएलने २०२३ पर्यंत एकूण विजेच्या ३० टक्के वीज नूतनीय स्रोतांकडून घेण्यासाठी यापूर्वीच वचनबद्धता जाहीर केली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल ) ही अदानी समूहाची ऊर्जा निर्मिती, पारेषण व किरकोळ वीज वितरण अशा एकात्मिक उद्योगात कार्यरत कंपनी आहे. कंपनी मुंबई व उपनगरातील ४०० चौरस कि.मी. क्षेत्रफळातील ३० लाख ग्राहकांना सेवा देते. याद्वारे २,००० मेगावॉट वीज मागणी पूर्ण केली जाते.