मुंबई : अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना सोमवारी सकाळच्या व्यवहारात २५ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीचा सामना करावा लागला. त्यामुळे समूहाच्या बाजार भांडवलाला एका दिवसात तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचा फटका बसला. अदानी समूहातील काही कंपन्यांच्या समभागांची मालकी असलेल्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) गोठविली असल्याचे वृत्त समभागांतील या मोठय़ा पडझडीस कारण ठरले.

अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागातील अग्रणी भागधारकांपैकी तीन परदेशी गुंतवणूकदार फंडांची खाती गोठविली गेलेली नाहीत आणि या संदर्भातील वृत्त ‘चुकीचे आणि दिशाभूल करणारे’ आहे, असा समूहाकाडून लेखी खुलासा गेला. त्यानंतर अदानी समूहातील सहा कंपन्यांचे समभाग घसरणीतून सावरताना दिसले, तरी बाजारातील व्यवहार थंडावताना हे समभाग मोठय़ा घसरणीसह बंद झाले.

सकाळी सत्रारंभी २४.९९ टक्के गडगडलेला अदानी एंटरप्राइजेसचा समभाग, सोमवारी बाजारात व्यवहार बंद झाले तेव्हा ६.२६ टक्क्यांच्या घसरणीसह १,५०१.२५ रुपयांवर स्थिरावला होता. त्याचप्रमाणे अदानी पोर्ट्स अँड एसईझेडमधील घसरणही १८.७५ टक्क्यांवरून सावरून दिवसअखेरीस ८.३६ स्थिरावली. अदानी ग्रीन एनर्जी ४.१३ टक्के घसरणीसह १,१७५.९५ रुपयांवर स्थिरावला. अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पॉवर या अन्य तीन कंपन्यांमध्ये प्रत्येकी ५ टक्क्यांची म्हणजे त्यांच्या खालच्या सíकटपर्यंत घसरण झाली.