नवी दिल्ली : एकंदर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराबाबत अर्थतज्ज्ञांकडून उघडपणे सांशकता व्यक्त केली जात असताना, भक्कम क्रयशक्तीच्या जोरावर भारताला चालू वित्त वर्षांत ७.२ टक्के विकासदर गाठता येईल, असा कयास आशियाई विकास बँक अर्थात ‘एडीबी’ने व्यक्त केला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेची व्याजदर कपात, शेतकऱ्यांना मिळणारे किमान उत्पन्न, देशांतर्गत वस्तूकरिता असलेली मागणी आदींमुळे २०१९ मध्ये भारताचा विकास दर ७.२ टक्के, तर २०२० मध्ये तो ७.३ टक्के असेल, असे ‘एडीबी’ने म्हटले आहे.

एडीबीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, २०१७ मध्ये ७.२ टक्के विकास दर नोंदल्यानंतर कमी कृषी उत्पादन आणि बाजारपेठेतील ग्राहक मागणी कमी राहिल्यामुळे पुढच्याच वर्षांत भारताचा विकास दर ७ टक्क्यांपर्यंत घसरला. तसेच जागतिक बाजारातील खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि केंद्र सरकारचा कमी खर्च याचाही परिणाम गेल्या वर्षीच्या विकास दरावर झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आशिया खंडाच्या विकासाचा आढावा घेताना बँकेने भारताचा समावेश असलेल्या दक्षिणपूर्व आशियातील सरासरी विकास दर ५ टक्के अपेक्षिला आहे. भारतासारख्या देशात वाढते उत्पन्न, कमी होणारी महागाई या अर्थव्यवस्थेच्या उभारीला हातभार लावतील, असा विश्वासही अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.

जागतिक स्तरावरील वातावरण पाहता तूर्त निर्यात मागणीच्या दृष्टीने चालू वर्ष स्थिर राहील, तर पुढच्या वर्षांत त्यात सुधार दिसून येईल, असा आशावाद या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.