एडेल्वाइज समूहातील बिगर-बँकिंग वित्तसंस्था ईसीएल फायनान्स लि.ने अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) विक्रीतून ४०० कोटी रुपये उभे करण्याचे प्रस्तावित केले आहे. १७ जूनपासून सुरू झालेली ही रोखेविक्री २ जुलै २०१४ रोजी संपुष्टात येईल. या ७० महिने मुदतीच्या रोखेविक्रीत सहभाग घेणाऱ्या गुंतवणूकदारांना १२% दसादशे दराने व्याज परतावा दिला जाईल आणि तो मासिक, वार्षिक अथवा संचयित स्वरूपात मिळविण्याचे पर्याय देण्यात आले आहेत.
या रोखेविक्रीतील तब्बल ५० टक्के हिस्सा हा व्यक्तिगत छोटय़ा गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. केंद्रात स्थानापन्न झालेले स्थिर व बहुमताचे सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडूनही आलेले नरमाईचे संकेत पाहता आगामी काळात व्याजाचे दर खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील ७० महिन्यांसाठी निश्चित १२ टक्के दराने आकर्षक परताव्यासाठी गुंतवणूक हा निश्चितच उत्तम पर्याय ठरतो, असे एडेल्वाइज फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे अध्यक्ष व मुख्याधिकारी रशेष शाह यांनी सांगितले.
काहीशी जोखीम स्वीकारून समाधानकारक लाभ मिळवू इच्छिणाऱ्यांनी गुंतवणूकयोग्य वरकडीचा काही हिस्सा या रोख्यांमध्ये गुंतविणे हितकारक ठरेल, असा सल्ला मुंबईतील ज्येष्ठ वित्तीय सल्लागारांनीही दिला आहे. परंतु या गुंतवणुकीतील जोखीम घटक  मात्र लक्षात घेण्याचा त्यांचा सल्ला आहे.
विक्रीपश्चात या रोख्यांची मुंबई (बीएसई), तसेच राष्ट्रीय (एनएसई) शेअर बाजारांमध्ये सूचिबद्धता होणार असल्याने ही गुंतवणूक तरलही असल्याचे वित्तीय सल्लागारांचे म्हणणे आहे.

जोखीम घटक
अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) हे निम्न गुणवत्तेचे विशिष्ट कंपनीला दिलेले गौण कर्ज (सबऑर्डिनेट डेट) असते. सदर रोखे विक्री बाजारात आणणारी एडेल्वाइज ही नाममुद्रा विश्वासार्ह असली तरी प्रसंगी कंपनीवर विपरीत आर्थिक प्रसंग उद्भवला आणि परतफेड शक्य न झाल्यास सर्वप्रथम कंपनीवर वरिष्ठ दायित्व (बँका व वित्तसंस्थांचे कर्ज) कमी करण्याला प्राधान्य दिले जाईल आणि त्यानंतर काही शिल्लक राहिलेच तर एनसीडी अर्थात गौण कर्जे विचारात घेतली जातात, हे लक्षात घ्यावयास हवे.