आदित्य बिर्ला समूहातील विविध वित्तीय सेवा व्यवसाय आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (एबीसीएल) या एका कंपनीच्या अखत्यारीत आले आहेत. या नव्या कंपनीची सूचिबद्धता शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात घसरणीसह झाली. एकूण सेन्सेक्स वाढूनही कंपनीचा समभाग मात्र ५ टक्क्यांनी घसरत २५० रुपयांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात त्याचे बाजार भांडवल ५४,६१५ कोटी रुपयांवर पोहोचले.

कंपनीचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांच्यासह आई राजश्री बिर्ला व पत्नी नीरजा बिर्ला यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने समूहाने कर्ज पुनर्बाधणी व्यवसायात उतरण्याचा मनोदय व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय श्रीनिवासन यांनी सांगितले की, आर्थिक विवंचनेत असलेल्या लघू व मध्यम उद्योगाच्या कर्जाची पुनर्बाधणी करण्याच्या व्यवसायात उतरण्याचा कंपनीचा मानस आहे.  यासाठी आवश्यक १०० कोटी रुपयांसह कंपनी बाजारात शिरकाव करेल. लघू व मध्यम उद्योगातील थकीत कर्जावर कंपनीचा भर असेल. देशात सध्या २३ मालमत्ता पुनर्बाधणी कंपन्या आहेत. बँकांनी लघू व मध्यम उद्योजकांना दिलेले कर्ज वसूल न झाल्याने बँका त्यांची विक्री करून ते या क्षेत्रातील खासगी कंपन्यांकडे हस्तांतरित केले जाते. मार्च २०१७ अखेर अशा कंपन्यांकडील थकीत कर्जे ७५,००० कोटी रुपयांची आहेत.