मुंबई : लुई फिलिप, पीटर इंग्लंड आणि व्हॅन ह्य़ूजेन या फॅशन नाममुद्रांचे स्वामित्व असलेल्या आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (एबीएफआरएल)ने मागणीप्रमाणे विशेष समारंभांसाठी उंची आणि आधुनिक पोशाख घडविणाऱ्या सुप्रसिद्ध फिनेस इंटरनॅशनल डिझाइनमधील ५१ टक्के भागभांडवली हिस्सा ९० लाख अमेरिकी डॉलर (सुमारे ६२ कोटी रुपये) मोबदल्यात खरेदी केला आहे.

एबीएफआरएलच्या संचालक मंडळातील अधिग्रहण समितीने बुधवारी फिनेस इंटरनशनलच्या ५१ टक्के समभागांचे संपादन करण्यास मंजुरी दिली, असे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला अधिकृतपणे कळविले आहे. प्राथमिक भांडवली भरणा आणि समभाग खरेदी यांच्या माध्यमातून हा अधिग्रहण व्यवहार पूर्ण केला जाणार आहे.

फिनेसच्या या अधिग्रहणामुळे तिची ‘शंतनू अँड निखिल’ ही नाममुद्रा एबीएफआरएलच्या ताफ्यात येणार आहे.

२००७ साली स्थापित फिनेस देशभरात पाच विक्रेता दालने असून,  शंतनू मेहरा आणि निखिल मेहरा या लोकप्रिय डिझायनरकडून रचित भारतीय पोशाखांची विक्री केली जाते.

एबीएफआरएलचे व्यवस्थापकीय संचालक आशीष दीक्षित म्हणाले, या संपादन व्यवहारामुळे या महत्त्वाच्या तसेच वेगाने वाढणाऱ्या विभागात कंपनीचे अस्तित्व अधिक खोलवर रुजेल आणि एकंदर ब्रॅण्डेड कपडय़ांच्या बाजारपेठेतील कंपनीचे आघाडीचे स्थान अधिक भक्कम होईल.