राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’मध्ये तीन वर्षांत वार्षिक दहा टक्के दराने वाढ होईल, अशी अपेक्षा आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाचे समभाग गुंतवणुकीचे प्रमुख महेश पाटील यांनी व्यक्त केली.

नव्याने गुंतवणूक करण्यासाठी सध्याचे मूल्यांकन योग्य असल्याचे मत महेश पाटील यांनी व्यक्त केले. बाजाराचे सध्याचे मूल्यांकन अवाजवी असल्याचे मानणारा गुंतवणूकदारांचा एक समुदाय असला तरीही गेल्या वर्षी मार्चमध्ये विक्रीमुळे झालेल्या घसरणीनंतर नजीकच्या काळातील पुनव्र्याप्तीबद्दल चिंता व्यक्त केली होती. व्यापार चक्र बदलते त्या वेळी केलेल्या गुंतवणुकीवर नफा होण्याची शक्यता असते, असे ते म्हणाले. वाढलेली महागाई आणि निच्चांकी व्याजदरामुळे बचतीची क्रयशक्ती टिकविण्यासाठी समभाग गुंतवणुकीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

मार्च २०२० पासून निफ्टीत ४० टक्यांहून अधिक वाढ झाली. सध्याच्या तेजीला चालना देणारी परकीय गुंतवणूक २०२१ मध्येही राहाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. करोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची हानी भरून काढली जाईल आणि भविष्यात नुकसानीचा अंशही राहाणार नाही, असे मत फंड घराण्याचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी मनीष डांगी यांनी व्यक्त केले.

डांगी म्हणाले की, २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्था ५ टक्क्यांनी आकुंचित (उणे) होईल. मार्चमध्ये धातू व तेल किमतीतील घसरणीमुळे आमचा गुंतवणुकीबाबतचा दृष्टिकोन सकारात्मक होता. या दोन्ही जिन्नसांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आमचा या बाबतचा दृष्टिकोन बदलून तटस्थ आहे; परंतु या जिन्नसांच्या किमती स्थिर राहिल्याचा भारताला फायदा होईल. ढोबळ आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२० अखेर म्युच्युअल फंड मालमत्ता २९.७१ लाख कोटी रुपये झाल्याचे गेल्या महिनाअखेर जाहीर करण्यात आले होते. तिमाही तुलनेत त्यात ७.६ टक्के वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले होते.