अॅडलॅब्जच्या भागविक्रीत छोटय़ा गुंतवणूकदारांना १२ रुपयांची सवलत

व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />मनोरंजन क्षेत्रातील अॅडलॅब्ज एन्टरटेन्मेंट लिमिटेडने येत्या १० मार्चपासून १० रुपये दर्शनी मूल्याच्या २.०३ कोटी समभागांची प्रारंभिक भागविक्री प्रस्तावित केली आहे. कंपनीने प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य प्रति समभाग किंमतपट्टा २२१ ते २३० रुपये निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ वैयक्तिक बोलीधारकांना जारी मूल्यावर १२ रुपये सवलत दिली जाणार आहे. समभाग बोली/विक्रीची समाप्ती १२ मार्च २०१५ रोजी होणार आहे. किमान बोलीचे प्रमाण ६५ समभाग आहेत आणि त्यानंतर ६५ समभागांच्या पटीत असतील.
मनोरंजन क्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध मनमोहन शेट्टी आणि थ्रिल पार्क लिमिटेड हे अॅडलॅब्जचे प्रवर्तक आहेत. याद्वारे थ्रिल पार्क लिमिटेडकडून १.८३ कोटी समभाग नव्याने, तर २ कोटी समभागांसाठी ‘ऑफर फॉर सेल’चा समावेश आहे. विक्रीनंतरच्या कंपनीच्या भरणा झालेल्या भांडवलामध्ये या विक्रीचे योगदान २५.४४% असेल. अॅडलॅब्ज एन्टरटेन्मेन्ट ही इमॅजिका – थीम पार्कची मालक कंपनी आहे व ती आघाडीचे मनोरंजन उद्यान चालवते.

ऑर्टेल कम्युनिकेशन्सची प्रति समभाग १८१ ते २०० रुपयांनी भागविक्री
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
प्रादेशिक दूरचित्रवाहिनी आणि वेगवान ब्रॉडबॅण्ड सेवा पुरवठादार ऑर्टेल कम्युनिकेशन्स लिमिटेडने १० रुपये दर्शनीमूल्य असलेल्या प्रति समभागाद्वारे भांडवली बाजारात उतरण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीच्या १.२ कोटी समभागांची प्राथमिक विक्री प्रकिया मंगळवारपासून सुरू झाली. १८१ रुपये दराने कंपनीचे २५.५७ लाख समभाग अॅक्सिस म्युच्युअल फंड आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सला मिळाले आहेत. ही रक्कम ४६.२९ कोटी रुपये आहे. प्रक्रियेसाठी प्रति समभाग किंमतपट्टा १८१ ते २०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये एनएसआर-पीई मॉरिशस एलएलसीकडून ६० लाख समभागांपर्यंत नव्या समभागांची प्राथमिक विक्री आणि ६० लाख समभागांपर्यंत ‘ऑफर फॉर सेल’चा समावेश आहे. विक्रीची समाप्ती गुरुवारी, ५ मार्चला होणार आहे.