वरळीसारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेला ‘अ‍ॅट्रिआ’ हा चार मजली मॉल विक्रीला काढण्यात आला आहे. सात वर्षांपूर्वी रोल्स रॉईससारख्या महागडय़ा कारच्या शोरुमद्वारे सुरू झालेला हा मॉल सध्या निम्मा रिकामाच आहे. दोन एकर जागेवरील १,००० कोटी रुपयांचे मूल्यांकन मिळविणाऱ्या या मॉलसाठी आता फ्युचर ग्रुप, शॉपर्स स्टॉपही उत्सुक असल्याचे समजते.
मॉलसाठी निवडलेले ठिकाण चुकीचे असून तेथे निवासी प्रकल्पच साकारावयास हवा होता, अशी मॉलच्या प्रवर्तकांची भावना बनली असल्याचे कळते. मुंबईच्या मॉल क्षेत्रातील यापूर्वीचा मोठा व्यवहार ताडदेव येथील ‘क्रॉसरोड’साठी झाला आहे. ‘अ‍ॅट्रिआ’ उभा राहिला त्याचवेळी फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी यांनी २६० कोटी रुपयांना हा मॉल पिरामल समूहाकडून विकत घेतला होता. आता खुद्द बियाणी यांनी देशभरात ७७ पँटलुन्स साखळी स्टोअर्सचा व्यवसाय अलीकडेच आदित्य बिर्ला समूहाला विकला आहेत.