एअर एशियाच्या रूपात मलेशियातील हवाई कंपनीबरोबर भागीदारी करत भारतीय अवकाशात स्वस्तातील विमान सेवा आणू पाहणाऱ्या टाटा समूहाने सिंगापूर एअरलाइन्सच्या सहकार्याने आणखी एका विमान कंपनीचा संकल्प सोडला आहे. भारतीय हवाई क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीनंतर एअर एशियापाठोपाठ टाटा समूहाची ही दुसरी हवाई प्रवासी वाहतूक कंपनी असेल. या माध्यमातून प्रीमिअम श्रेणी तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास उपलब्ध करण्याचा टाटा समूहाचा प्रयत्न असेल, अशी अटकळ आहे.
नव्या कंपनीत टाटा समूहाच्या मुख्य प्रवर्तक टाटा सन्सचा हिस्सा मोठा म्हणजे ५१ टक्के असेल, तर उर्वरित ४९ टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाइन्सचा असेल. मूळच्या मलेशियन कंपनी एअर एशियाच्या भारतीय हवाई कंपनीत  टाटांच्या (३० टक्के) बरोबरीने भारतीय हवाई कंपनीत तिसरा भागीदारही (टेलिस्ट्रा ट्रेडप्लेसचे अरुण भाटिया) आहे.
सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीने अस्तित्वात येणाऱ्या नव्या हवाई कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे राहणार असून, या कंपनीचे नाव तसेच व्यवस्थापन चमूची घोषणा लवकरच केली जाईल, असे संयुक्तरीत्या गुरुवारी जाहीर करण्यात आले. नव्या भागीदारींतर्गत करार करण्यात आला असून, याबाबतचा प्रस्ताव विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे मंजुरीसाठी दिला असल्याचेही सांगण्यात आले.
एअर एशियासह स्वस्तातील विमान सेवा लवकरच सुरू करण्याच्या तयारीतील कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मिट्टू शांडिल्य यांची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. तर सिंगापूर एअरलाइन्सबरोबरच्या नव्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून टाटा सन्सने प्रसाद मेनन यांची नियुक्ती केली आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती..
टाटा समूहाचे जे.आर.डी. टाटा यांनी १९३२ मध्ये अस्तित्वात आणलेल्या टाटा एअरलाइन्स या देशातील पहिल्या विमान कंपनीचे १९४६ मध्ये एअर इंडिया असे नामकरण झाल्यानंतर १९५३ मध्ये तिचे राष्ट्रीयीकरणही झाले, हा इतिहास सर्वानाच माहीत आहे. टाटांचे वारस व स्वत: उत्तम पायलट असणाऱ्या रतन टाटा यांनी पुन्हा भारतीय हवाई क्षेत्रात झेप घेण्याचा विचार ९० च्या दशकात केला होता. यासाठी १९९५ मध्ये केलेला अर्ज १९९७ च्या नव्या विदेशी हवाई धोरणामुळे आपोआपच बाद ठरला. सिंगापूरबरोबरच टाटा समूहाने २००० मध्ये एअर इंडियातील निर्गुतवणुकीसाठी एकत्रित निविदा सादर केली होती. मात्र वर्षभरातच ती मागे घेण्यात आली. मध्यंतरी समूहातील टाटा मोटर्सचा नॅनो प्रकल्प गुजरातेत हलवावा लागण्याचा वादंग सुरू असताना, रतन टाटा यांनी ‘हवाई कंपनी सुरू करण्यासाठी आपल्याला सरकारला लाच द्यावी लागेल काय,’ असा जाहीर सवाल करीत नव्या वादाला तोंड फोडले. टाटा समूहाचे या क्षेत्रात येण्याचे मनसुबे आता पूर्णत्वास येत आहेत. तेही एका नव्हे तर दोन कंपन्यांच्या माध्यमातून!