मतदानोत्तर चाचण्यांचा प्रभाव; रुपयाही वधारला

केंद्रात पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार येण्याच्या आशेने भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहारंभीच गेल्या दशकातील सर्वोत्तम सत्रझेप नोंदविली. रविवारी जाहीर झालेल्या अंतिम मतदानोत्तर चाचणीतील अंदाजाचे स्वागत होताना दोन्ही प्रमुख निर्देशांक सोमवारी त्यांच्या सर्वोच्च टप्प्यानजीक पोहोचले. सलग तिसऱ्या वाढीने मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती एकाच सत्रात ५.३३ लाख कोटी रुपयांनी वाढली. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाही ७० नजीक भक्कम बनला.

आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहाराची तेजीसह सुरुवात करणारा सेन्सेक्स शुक्रवारच्या तुलनेत एकाच सत्रात तब्बल १,४२१.९० अंश उसळीसह ३९,३५२.६७ वर पोहोचला. तर निफ्टी ४२१.१० अंश झेप घेत ११,८२८.२५ पर्यंत स्थिरावला. सत्राच्या सुरुवातीपासून तेजीच्या लाटेवर स्वार मुंबई निर्देशांक व्यवहारात ३९,५७०.०४ तर निफ्टी ११,६२३.३० पर्यंत झेपावला होता.  प्रसंगी वाढत्या इंधनदरांकडेही गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले आहे. २०१३नंतर प्रथमच एका सत्रात इतकी प्रचंड उसळी दिसली.

विशेष म्हणजे, सोमवार सकाळपासून जगभरच्या भांडवली बाजारांमध्ये मोठी घसरण सुरू होती. प्रमुख बाजारांमध्ये मुंबई बाजार अपवाद ठरला. इतर भांडवली बाजारांवर प्रामुख्याने बाह्य़घटकांचा विपरीत परिणाम होत असताना, सेन्सेक्सवर मात्र अंतर्गत घटकांचा मोठा प्रभाव पडला. येत्या २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीत भाजप किंवा एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यास सेन्सेक्स ४० हजारांचे शिखरही सर करेल, असा काही विश्लेषकांचा अंदाज आहे. मात्र, या अंदाजानुरूप निकाल आले नाहीत, तर प्रचंड मोठी घसरणही होऊ शकते, असा इशारा काही विश्लेषक देतात.

मुंबई शेअर बाजारात सलग तीन व्यवहारात नोंदविले गेलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता एकूण ७.४८ लाख कोटी रुपयांनी उंचावली आहे.

‘पैसा’ झाला मोठा..

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सोमवारच्या एकाच व्यवहारात तब्बल ४९ पैशांनी झेपावताना सत्रअखेर ६९.७४ वर स्थिरावले. रुपया शुक्रवारी ७०.२३ वर होता. सोमवारच्या रूपात रुपयाने १८ मार्चनंतरची सर्वात मोठी सत्रझेप नोंदविली.

वार्षिक मूल्यउच्चांक : सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील ६६ कंपनी समभागांनी सोमवारच्या एकूण वाढीमुळे वर्षभराचा मूल्यउच्चांक गाठला.