सहारा प्रकरणाला प्राप्त होत असलेल्या नवनव्या वळणाने सर्वोच्च न्यायालयही व्यथित झाले असून मालमत्ता विकून निधी उभारणीच्या या प्रक्रियेत आता न्यायाधीशांच्या समितीला देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ‘प्रत्येक जण अडचणीत आहे. अशा स्थितीत अधिक काळ राहता येणार नाही. ५ ते १० हजार कोटींच्या रकमेसाठी खोटे कागदपत्र सादर करणाऱ्यांना काय म्हणावे?’ असे नमूद करीत न्यायालयाने न्या. बी. एन. अगरवाल यांच्या देखरेखीखाली समिती नेमली आहे. सुब्रतो रॉय यांच्या जामिनासाठी मालमत्ता विकून रक्कम उभी करण्याच्या प्रयत्नातील अमेरिकेच्या मिराच या मध्यस्थ कंपनीने व्यवहारातून काढता पाय घेतला आहे. माघारीनंतरही या व्यवहाराच्या चाचपणीसाठी निश्चित केलेले शुल्क सहाराकडे जमा करतानाच समूहाच्या विदेशातील तीन मालमत्ताच्या संपूर्ण खरेदीसाठी आपण आजही उत्सुक असल्याचे ‘मिराच’ने स्पष्ट केले आहे.

‘फिक्की’च्या ‘स्त्री विशेष’ उपक्रमाची मुंबईत मुहूर्तमेढ
मुंबई : उद्योगक्षेत्राची अग्रेसर महासंघ ‘फिक्की’च्या महिला विभागाने स्त्रियांच्या बलशालीकरणाचे उद्दिष्ट ठेवून हाती घेतलेल्या ‘सर्व महिला’ उपक्रमाला मुंबईतही बुधवारी सुरुवात झाली. आर्थिकदृष्टय़ा कमकुवत समाज घटकांतील ११५ महिला व तरुण मुलींची गेल्या वर्षी कौशल्य विकासाच्या ‘स्वेल’ या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आणि त्यांना रत्न व आभूषणे, विवाह उद्योग, जीवनशैली, तंदुरुस्ती व स्वास्थ्य निगा अशा क्षेत्रांत प्रशिक्षित करण्यात आले. या प्रशिक्षणाने जीवन बदलून स्वयंव्यवसायी बनलेल्या निवडक ११ मुलींचा गौरव सोहळा बुधवारी मुंबईत खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते पार पडला. फिक्कीच्या मुंबईतील महिला विभागाने व्यवसायवृत्ती असलेल्या महिलांना त्यांच्या कल्पना तज्ज्ञ मार्गदर्शनातून यशस्वी उद्योग कल्पनेत बदलण्यास मदत करणारा ‘स्वयम्’ उपक्रमही सुरू केला आहे.

नव्या औद्योगिक धोरणात मारक कायद्यांना कात्री
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />युती शासनाचे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर केले जाणार असून त्यात उद्योगक्षेत्राला अडसर ठरणारे अनावश्यक कायदे रद्द करण्याचे पाऊल उचलले जाईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजिक २२ व्या ‘उद्योगश्री’ गौरव सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोकुयो कॅम्लिनचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर होते.
उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, आगामी उद्योग धोरणात अनावश्यक कायदे कमी केले जातील. राज्यात लवकरच ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, २० लाख रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांना जीवनगौरव, श्रीकांत सावे यांना उद्योगश्री गौरव तर जान्हवी राऊळ, श्वेता इनामदार, रिता माहोरे, वृषाली पोतनीस, दिलीप गट्टी, चंद्रकांत जोष्टे, विजय गांगण, लक्ष्मण कोलते, उमाशंकर सिंग, गजानन जाधव व नाशिकच्या विजय मोटर ड्रायव्हिंग स्कूलला उद्योगश्री गौरव सन्मान बहाल करण्यात आले.

मित्सुबिशी इलेक्ट्रिकची मुंबईत तीन विक्री दालने
मुंबई : आजवर केवळ व्यापार ते व्यापार असे व्यावसायिक जाळे असलेल्या जपानची जागतिक आघाडीची वातानुकूल उपकरण निर्माती कंपनी मित्सुबिशी इलेक्ट्रॉनिक्सने आता किरकोळ दालने थाटून थेट सामान्य ग्राहकांसाठी आपली उत्पादने खुली केली आहेत. कंपनीच्या पहिल्या तीन शोरूम्स मुंबईत मुलुंड (प.), चेंबूर आणि दादर (प.) येथे नुकत्याच सुरू झाल्या आहेत. या दालनांचे ‘एमईक्यू हिरोबा’ असे ब्रॅण्ड नाव आहे.
आयएमसी-श्रीलंका नॅशनल चेंबर सामंजस्य
मुंबई : इंडियन र्मचट्स चेंबरच्या नवी मुंबई विभागाचे अध्यक्ष आर. के. जैन, उपाध्यक्ष योगेश मेहता यांच्या नेतृत्वात कोलंबो येथे गेलेल्या शिष्टमंडळाने श्रीलंकेच्या नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सशी सामंजस्याचा करार केला आहे. मसाले उत्पादने, वनौषधी उत्पादने, सुका मेवा, सौंदर्यप्रसाधने, रसायने, फॅब्रिकेशन आणि आयटी या क्षेत्रांतील ११ कंपन्यांचे १७ उच्चाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.