भारतीयांना स्वस्तातील हवाई प्रवास देण्यासाठी सज्ज होत असलेल्या एअरएशिया इंडिया या हवाईसेवेचे मुख्य सल्लागार म्हणून रतन टाटा यांची नियुक्तीनंतर, अध्यक्षपदी एस. रामादोराई यांचे नाव जाहीर झाले आहे. मूळच्या मलेशियन कंपनीच्या भारतीय व्यवसायात टाटा उद्योगाची भागीदारी टक्केवारीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर असली तरी समूहातील दोन मातब्बर पदांवरील नियुक्तीने कंपनीवर टाटा समूहाचेच वर्चस्व असेल, असे चित्र पुढे आले आहे.
एअर इंडियाच्या रूपात देशातील पहिली हवाई सेवा सुरू करण्याचा टाटा समूहाचा मान पाहता टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना एअरएशिया इंडियाचे मुख्य सल्लागार नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर देशातील पहिल्या क्रमांकाची व टाटा समूहातील माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसचे माजी मुख्याधिकारी एस. रामादोराई यांची नव्या हवाई कंपनीचे अध्यक्ष म्हणून निवड जाहीर झाली आहे.
कंपनी ताबा आणि विलीनीकरण सल्लागाराचा अनुभव असलेल्या दक्षिण भारतातील मिट्टू शांडिल्य यांच्याद्वारे एअरएशिया इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा शोध संपल्यानंतर गेल्या महिन्यात घोषित कंपनीच्या चार संचालकांमध्ये आर. व्यंकटरमणन आणि भारत वासानी अशी टाटा समूहातीलच दोघांची वर्णी लागली आहे.