करोना लॉकडाउनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने सुरू होऊ लागल्याने, इतके दिवस घरात असलेली लोकं आता बऱ्याच प्रमाणात घराबाहेर पडू लागली आहेत. एवढच नाहीतर पर्यटनस्थळांकडेही लोकांची पावलं वळली आहेत. सर्वोतोपरीत काळजी घेत लोकं विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येत असल्याने, पर्यटन व्यवसायास देखील हळूहळू चालना मिळू लागली आहे.

अतिथ्यव्यवसायात आघाडीवर असलेल्या ओयो हॉटेल्स अॅण्ड होम्सच्या माहितीनुसार, अनेक महिने घरात अडकून पडल्यानंतर या दिवाळीत भारतीय पर्यटक समुद्रकिनारे आणि रोड ड्राइव्ह करून परराज्यातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यास प्राधान्य देत आहेत. ओयो च्या ‘दिवाळी बुकिंग ट्रेंड्स’ या आकडेवारीनुसार जयपूर, केरळ, गोवा, विशाखापट्टणम आणि वाराणसी ही पर्यटनस्थळे अधिक पसंती मिळवत आहेत. तर भारताचे ‘बीच कॅपिटल’ म्हणून ओळखले जाणाऱ्या गोव्याला मात्र संपूर्ण देशातूनच पर्यटक येऊ लागले आहेत. यात अर्थातच बहुतांश बुकिंग पुणे, बंगळुरू आणि हैदराबादमधून होत आहे.

ओयो इंडिया अॅण्ड साऊथ आशिया फ्रँचाइज व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष हर्षित व्यास म्हणाले, “सणासुदीचे दिवस आणि टप्प्याटप्प्याने होत असलेला अनलॉक यामुळे आनंद पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत सप्टेंबर पासून मोठी वाढ होत आहे. राज्यांच्या सीमा पर्यटकांसाठी खुलत आहेत आणि ओयो सकट सर्वच आतिथ्य व्यवसाय पर्यटकांची भीती घालवून त्यांना सुटीचा पुरेपूर आणि सुरक्षित आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिवाळीच्या बुकिंगचा कल पहिला तर सोशल डिस्टनसिंग पाळता यावे यासाठी सुरक्षित ठरतील अशा आपल्या वाहनाने रस्त्याने प्रवास करण्याला (ड्राइव्ह ट्रिप ) पसंती दिसते आणि म्हणूनच या दिवाळीच्या सुटीत आंतरराज्य प्रवास करण्याच्या प्रमाणात मोठी भर पडली आहे. येत्या काही महिन्यात पर्यटकांची भीती जाऊन आनंदपर्यटनाच्या स्थळांना भेट देण्याचे प्रमाण जोरात वाढेल अशी आम्हाला अशा आहे. ”

पर्यटन व्यवसायातील निरीक्षणानुसार एप्रिल-सप्टेंबर २०२० या काळात मुख्यतः व्यवसायानिमित्त प्रवास करण्याच्या शहरांमध्ये – दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता बुकिंगची संख्या वाढत आहे. याउलट सुटीत प्रवास करण्याच्या ठिकाणी – उदा. सिमला, मनाली, मुन्नार, उटी आणि गंगटोक – जी आधी मागणी नरम होती, तिथे बुकिंगच्या प्रमाणात वाढ होत आहे.

ओयोने अलीकडेच ओयो सदस्य असलेल्या सोनू सूदला ब्रँड अँम्बेसेडर नेमून सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव यावा यासाठी ” सॅनिटाइज्ड बिफोर युवर आईज” – तुमच्या समक्ष सॅनिटायझेशन, हा उपक्रम सुरु केला आहे. पर्यटक हॉटेलच्या सेवकवर्गाला विनंती करून संसर्ग होण्याचा धोका असलेल्या जागा आपल्या डोळ्यांसमोर सॅनिटाईज करून घेऊ शकतात. कॉन्टॅक्ट लेस चेक इन हाही डिजिटल मार्गाने चेक इन करून संसर्ग टाळणारा उपक्रम आहे.