गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत होतं. परंतु गेल्या अनेक दिवसांच्या तेजीनंतर मंगळवारी सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यातील सोन्याच्या दरात ०.६३ टक्क्यांची घसरण होऊन ते दर ५४ हजार ६०० रूपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरातही १ टक्क्यांची घसरण होऊन ते ७४ हजार ७०० रूपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात सोन्याचा दर ५६ हजार १९१ रुपयांवर पोहोचला होता. मागील सत्रात सोन्याच्या दरात ०.३५ टक्क्यांची तर चांदीच्या दरात २ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

शुक्रवारी सोन्याचे दर तब्बल १ हजार रूपये प्रति १० ग्रॅम इतके घसरले. यापूर्वी जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर ५६ हजार १९१ रूपयांवर पोहोचले होते. सोमवारी सोन्याचे दर ५४ हजार ९४६ प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. तर ५ ऑक्टोबर रोजी वितरीत होणाऱ्या सोन्याचे दर मंगळवारी सकाळी ५४ हजार ७५० रूपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. म्हणजेय सोन्याच्या दरामध्ये १९६ रूपयांची घसरण झाली होती.

जागतिक बाजारपेठेचा परिणाम सोन्याचांदीच्या दरांवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’च्या दरात ०.३ टक्क्यांची घट होऊ तो २ हजार २१.३२ डॉलर्स प्रति औंस झाला. याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही १.२ टक्क्यांची घसरण होऊन ती २८.८१ डॉलर्स प्रति औंसवर आली. तर प्लॅटिनमच्या दरातही घसरण होऊन ते ९७८,१० डॉलर्स प्रति औंस झालं. “डॉलरमध्ये आणखी रिकव्हरी आल्यास सोन्याच्या दरात आणखी घसरण पाहायला मिळू शकते,” असं कोटक सिक्योरिटीजनं एका नोटमध्ये म्हटलं आहे.