कांद्याचे भाव गगनाला भिडत असताना नाफेडने पाकिस्तान, चीन, इजिप्त या देशातून १० हजार टन कांदा आयात करण्यासाठी फेरनिविदा काढल्या आहेत. यापूर्वीच्या निविदा प्रक्रियेस पुरवठादारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
कांद्याचे दर हे वाढत असून त्याला मागणी व पुरवठा यातील तफावत कारण आहे. कांद्याचे किरकोळ दर दिल्लीत ६० रूपये किलो आहेत. देशातही बहुतांश तसेच दर आहेत.
कृषी सचिव सिराज हुसेन यांनी सांगितले की, आधीच्या निविदांत नाफेडने १० हजार टन कांदा आयातीसाठी निविदा मागवल्या, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कांद्याच्या आयातीनंतर भाव उतरण्याची अपेक्षा आहे. २७ ऑगस्टपूर्वी निविदा सादर करायच्या असून त्या त्याच दिवशी उघडल्या जातील व खरेदी आदेशानंतर तीस दिवसात पुरवठा करावा लागणार आहे. कांद्याचे उत्पादन २०१४-१५ मध्ये १८९ लाख टन होते, ते वर्षभरापूर्वी १९४ लाख टन होते. महाराष्ट्र, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांत कांद्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते