वयाच्या पासष्टीपर्यंत आता गुंतवणूक शक्य

निवृत्तीपश्चात जीवनमानासाठी आर्थिक तरतुदीसाठी गुंतवणूक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस)’मध्ये वयाच्या पासष्टीपर्यंत गुंतवणुकीची मुभा देणाऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयाची सरकारने घोषणा केली आहे. बिगर सरकारी आस्थापनांतील कर्मचारी, खासगी व अनौपचारिक क्षेत्रातील पगारदार तसेच स्वयंरोजगार करणाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित पेन्शनलाभासाठी ही योजना उपयुक्त असून, या निर्णयाचे त्यांना लाभ होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

आतापर्यंत ‘एनपीएस’ योजनेसाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे तर कमाल ६० वर्षे अशी होती. पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)ने घेतलेल्या ताज्या निर्णयानंतर आता वयाच्या ६५व्या वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.

वयाच्या साठीनंतर एनपीएस योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना, गुंतवणुकीसाठी फंडाला पसंतीचे तसेच पेन्शन फंडाचे पर्याय हे प्रचलित ६० वर्षे वयापर्यंत गुंतवणूकदार सदस्यांसाठी असलेल्या पर्यायासारखेच असतील, असे पेन्शन नियामकांनी स्पष्ट केले आहे. तथापि साठीनंतर ‘एनपीएस’चे सदस्यत्व मिळविणाऱ्यांना, गुंतवणूक सुरू केल्यानंतर तीन वर्षे पूर्ण केल्यावर निर्गमनाचा पर्याय खुला असेल. मात्र त्यांनाही जमा पुंजीपैकी किमान ८० टक्के रक्कम ही नियमित पेन्शन प्राप्तिसाठी वर्षांसन (अ‍ॅन्युइटी) खरीदण्यासाठी वापरणे अनिवार्य असेल. उर्वरित २० टक्के रक्कम त्यांना लाभासह एकरकमी मिळविता येईल. अन्यथा अ‍ॅन्युइटी खरीदण्याचा हा नियम किमान ४० टक्के रकमेला लागू आहे.

सेवानिवृत्तीचे वय एकीकडे वाढत चालले आहे आणि मुख्यत: ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील व्यापक घटकाला निवृत्तीनंतर नियमित लाभ मिळविण्याची संधी मिळावी, हा हेतू लक्षात घेऊनच वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे, असे पीएफआरडीएने स्पष्ट केले आहे.

  • ‘एनपीएस’ योजनेसाठी सध्याची वयोमर्यादा किमान १८ वर्षे तर कमाल ६० वर्षे.
  • ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील व्यापक घटकाला निवृत्तीनंतर नियमित लाभ मिळविण्याची संधी.
  • मात्र किमान ८० टक्के रक्कम अ‍ॅन्युइटी खरेदीसाठी वापरणे अनिवार्य.