जिल्ह्य़ातील ५४० मे.वॉट. क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प एका खाजगी कंपनीकडून खरेदी करण्यासंदर्भातील करार टाटा पॉवर लि.ने रद्द केल्याची माहिती आहे.
बुटीबोरीजवळ आयडियल एनर्जी प्रोजेक्ट लि.ने २०१३ मध्ये नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड तालुक्यातील खुर्सापार येथे २७० मे.वॉ.. क्षमतेचे दोन वीजनिर्मितीचे दोन युनिट सुरू करण्याचे जाहीर केले होते. २०१३ मध्ये यापैकी २७० मे.वॉ.चे युनिट सुरू करण्यात आले होते. मात्र, कालांतराने कंपनी आर्थिक अडचणीत आली होती. गतवर्षी टाटा पॉवर कंपनीने आयडियल एनर्जीसोबत हे युनिट खरेदी करण्याचा करार केला होता. आता हा करार रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

रुपया ६८च्या तळातून बाहेर
मुंबई: भांडवली बाजारातील सप्ताहअखेरच्या उत्साहानंतर चलन व्यासपीठावरही तेजी दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया ३९ पैशांनी उंचावत ६८च्या खोलातून वर आला. गुरुवारी गेल्या २९ महिन्यांचा तळ राखणारे स्थानिक चलन शुक्रवारी ६७.६३ पर्यंत झेपावले. चलनाची आठवडय़ातील शेवटच्या सत्राची सुरुवातच ६७.८० या वरच्या टप्प्यावर झाली. दिवसभर वाढीवर स्वार असलेला रुपया सत्रात ६७.६१ पर्यंत झेपावला. दिवसअखेर गुरुवारच्या तुलनेत ०.५७ टक्क्य़ांनी वाढला. गेल्या दोन व्यवहारात रुपया ३७ पैशांनी रोडावला होता. यामुळे रुपयाने ६८च्याही खालील, गेल्या २९ महिन्यांचा नीचांक नोंदविला होता.