मुंबई : टाटा सन्सवर सायरस मिस्त्री यांची पुन्हा नियुक्ती करण्याचा राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाने दिलेल्या निकालाचे येत्या ९ जानेवारीला नियोजित टाटा समूहातील महत्त्वाचे अंग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस) संचालक मंडळावर स्पष्ट सावट दिसून येत आहे. या बैठकीआधी सर्वोच्च न्यायालयात या निकालाला आव्हान देऊन स्थगन आदेश मिळविणे टाटा समूहाला क्रमप्राप्त ठरले आहे.

टाटा सन्सकडून कंपनी न्यायाधिकरणाच्या निकालाला आव्हान देणारा अर्ज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला जाणे अपेक्षित आहे. मात्र नाताळनिमित्त सुरू असलेल्या सुट्टीनंतर, सर्वोच्च न्यायालयाचे नित्य कामकाज ६ जानेवारीपासून सुरू होत असून, त्याच वेळी हा अर्ज सुनावणीला घेतला जाणे अपेक्षित आहे.

अपील न्यायाधिकरणाने १८ डिसेंबरला दिलेल्या धक्कादायक निकालात, सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी तसेच समूहातील टीसीएस, टाटा इंडस्ट्रीज आणि टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस (महाराष्ट्र) या अन्य तीन कंपन्यांच्या अध्यक्षपदी फेरनियुक्तीचे आदेश दिले आहेत.