भारतातील विविध प्रकल्पांमध्ये येत्या काळात १.९ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेने (एआयआयबी) दर्शविली आहे.

बँकेच्या पुढाकाराने येत्या आठवडय़ात दोन दिवसांची एक परिषद मुंबईत होत असून त्यात याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दोन हजारांहून अधिक व्यावसायिक हजर असतील. दोन दिवसात यानिमित्ताने २२ चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत.

बँकेचे उपाध्यक्ष आणि कंपनी सचिव डॅनी अलेक्झांडर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, भारतातील विविध पायाभूत प्रकल्पांसाठी आणखी गुंतवणूक करण्याची बँकेची इच्छा आहे. यापूर्वी १.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक जाहीर केली गेली आहे. बँकेमार्फत देशात येत्या काही वर्षांमध्ये ४.५ अब्ज डॉलर गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे.

चीनमधील बिजिंग येथे मुख्यालय असलेल्या या बँकेत भारत हा देखील एक भागीदार आहे. भारतातील राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधीकरिता गुंतवणूक करण्यात येणार आहे. हा निधी मुंबई मेट्रोच्या विस्ताराकरिता उपयोगी येणार आहे.