मुंबई : वाढते शहरीकरण, पर्यायाने प्रदूषणातील वाढ, त्याचप्रमाणे वातावरणातील विपरीत बदलामुळे बिघडलेले हवामान यामुळे भारतात अधिकाधिक घर-कार्यालयांमध्ये या संबंधाने तंत्रज्ञानात्मक उपाययोजनांकडे कल वाढला असून, हीटिंग, व्हेंटिलेशन, एसी आणि रेफ्रिजरेशन (एचव्हीएसी अँड आर) या उद्योगक्षेत्राला त्यामुळे बरे दिवस आले आहेत. या उद्योगातून उत्पादित उपकरणांची बाजारपेठ त्यामुळे चालू वर्षांत ७ अब्ज डॉलर साधारण ५० हजार कोटींचा टप्पा गाठेल, असे अंदाजले जात आहे.

एकीकडे वाढत्या शहरीकरणाने वेगाने बदलत असलेली जीवनशैली आणि वातावरणातील बदलानुरूप निर्माण झालेल्या गरजा यामुळे देशाच्या एका भागात वातानुकूलन यंत्रे, अत्याधुनिक व्हेंटिलेशन यंत्रणा व रेफ्रिजरेटर्सची मागणी आहे, तर त्याचवेळी दुसऱ्या भागात वातावरण गरम ठेवण्यासाठी हीटरलाही मागणी अशी स्थिती भारतात असल्याचे ‘अ‍ॅक्रेक्स इंडिया २०१९’च्या राष्ट्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष विशाल कपूर यांनी सांगितले.

भारतात एव्हीएसी उद्योगाला असलेल्या अमाप संधींचे वर्णन करताना कपूर यांनी मुख्यत: आदरातिथ्य आणि आरोग्यनिगा क्षेत्रातून मोठी मागणी असल्याचे स्पष्ट केले. जागतिक स्तरावर वातानुकूलन आणि शीतकरण उपकरणांची बाजारपेठे सरासरी ७ टक्के दराने वाढत आहे, तर भारतात या बाजारपेठेचा वाढीचा दर ३०-४० टक्क्य़ांच्या घरात आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

या उद्योगाला वाहिलेले अ‍ॅक्रेस इंडिया २०१९ हे तीन दिवसांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईत झाले. वेगवेगळ्या २५ देशातील ५०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग असलेल्या या बी २ बी प्रदर्शनाला ५०,००० हून अधिक व्यावसायिक व व्यापार प्रतिनिधींनी भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.

विक्रीत ३० टक्के वाढीचे ‘एलजी’चे लक्ष्य

मुंबई : आघाडीची ग्राहकोपयोगी उत्पादनांची नाममुद्रा एलजी इलेक्ट्रॉनिक्सने भारतीय बाजारपेठेत सर्वप्रथम इन्व्हर्टर स्प्लिट एसी उपकरणे सादर केली आणि निरंतर उत्पादन नावीन्यतेचा ध्यास कंपनीने कायम सुरूच ठेवला असल्याचे ‘अ‍ॅक्रेस इंडिया’ प्रदर्शनात कंपनीने सादर केलेल्या नवनवीन वातानुकूलन उत्पादनांना प्रत्यय दिला.

व्हीआरएफ सिस्टीम्स, विनाविलंब गरम पाणी तयार करणारे हायड्रो किट, मॅग्नेटिक बेअरिंग सेंट्रिफ्युगल चिलर त्याचप्रमाणे इन्व्हर्टर डक्टेड, इन्व्हर्टर कॅसेट तसेच इन्व्हर्टर फ्लोअर स्टॅडिंग वातानुकूलन यंत्रे भारतीय बाजारात पहिल्यांदाच दाखल होत असल्याचे, एलजीचे या विभागाचे व्यवसायप्रमुख सुनील खतवानी यांनी सांगितले.

सध्या वाणिज्य वापराच्या वातानुकूल यंत्रांच्या बाजारपेठेत एलजी चौथ्या क्रमांकावर असून, वार्षिक सरासरी ३० टक्के विक्रीत वाढ कंपनीकडून गेल्या काही वर्षांत नोंदविली जात असून, चालू वर्षांतही विक्रीत वाढीचे हे लक्ष्य गाठले जाईल, असे खतवानी यांनी स्पष्ट केले.