घरगुती वापराच्या वातानुकूल यंत्राच्या क्षेत्रात उशिराने प्रवेश करूनही गतिमान प्रगती करणाऱ्या ब्ल्यू स्टार लिमिटेडने चालू २०१७-१८ वर्षांत २० टक्क्य़ांहून अधिक विक्रीत वाढ आणि १२.५ टक्के बाजारहिस्सा काबीज करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. गत सहा वर्षांत या वर्गवारीत कंपनीचा बाजारहिस्सा ३ टक्क्य़ांवरून ११ टक्क्य़ांवर पोहोचला आहे.

भारताची घरगुती वातानुकूलन यंत्राची बाजारपेठ १५,००० कोटींच्या घरात जाणारी आहे आणि साधारण २० टक्के दराने ती वाढत आहे. त्याउलट गत वर्षांत ब्ल्यू स्टारने ३५ टक्क्य़ांचा वृद्धी दर नोंदविला आणि निश्चलनीकरणाच्या दोन महिन्यांचाही कोणताही विपरीत परिणाम दिसून आला नाही. हा वृद्धीदर चालू वर्षांत कायम राहिल्यास, १२.५ टक्के बाजारहिस्सा सहज मिळविता येईल, असा विश्वास वाणिज्य वापराच्या शीतयंत्रांमधील अग्रणी ब्ल्यू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

भारतात सध्या ५० लाख घरांमध्ये वातानुकूल यंत्रांचा वापर होत आहे, २०२० पर्यंत त्यात दुपटीने वाढ संभवेल, असा विश्वास त्यागराजन यांनी व्यक्त केला. चीनमध्ये मात्र सध्या पाच कोटी घरांमध्ये म्हणजे दर १०० घरांमागे सरासरी ३० घरात वातानुकूल यंत्र वापरात आहेत. भारताच्या तुलनेत चीनची वातानुकूल यंत्राची बाजारपेठ दसपटीने मोठी आहे. अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराबाबत चीन व भारतात साधारण ९-१० वर्षांची दरी दिसून येते, मात्र वातानुकूल यंत्रांबाबत ही तफावत १५-१६ वर्षांपर्यंत जाणारी आहे. म्हणजे भारतात सध्या जी बाजारस्थिती आहे ती चीनने १५ वर्षांपूर्वीच गाठली होती. तथापि उत्पादन नाविन्य आणि विशेषत: वीज बचत करणाऱ्या इन्व्हर्टर तंत्रज्ञानामुळे ही दरी वेगाने भरून येत असल्याचे त्यागराजन यांनी सांगितले. भारतात सध्या इन्व्हर्टर एसी मॉडेल्स वापराचे प्रमाण अवघे १५ टक्के जरी असले तरी २०२० पर्यंत हे प्रमाण ६० टक्क्य़ांवर जाईल, असा त्यागराजन यांनी देशातील पहिल्या दशांश फरकाने शीतलता शक्य करणाऱ्या इन्व्हर्टर स्प्लिट एसी यंत्राच्या प्रस्तुती करताना दावा केला. पाच तारे असलेल्या इन्व्हर्टर एसीद्वारे तब्बल ६५ ते ७० टक्क्य़ांपर्यंत होणारी वीज बचत हा भारतीय ग्राहकांना आकर्षित करणारा सर्वात मोठा गुण असून, येत्या काळात याच बाजारवर्गावर लक्ष केंद्रित करण्याचे ब्ल्यू स्टारचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.

दमदार पाऊस तारक आणि मारकही!

वातानुकूलन यंत्रांच्या बाजारपेठेसाठी कडाक्याचा उन्हाळा आणि दमदार बरसणारा पाऊस दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत. पाऊस चांगला झाला आणि लांबला तर तो बाजारपेठेला मारक ठरतो हे काही प्रमाणात खरे असले तरी ही बाब ब्ल्यू स्टारसाठी मात्र उपकारक ठरेल, असे त्यागराजन म्हणाले. ब्ल्यू स्टारच्या एकूण विक्रीपैकी ६० टक्के हिस्सा हा छोटी शहरे व निमशहरी भागांतून येतो आणि संपूर्ण भाग शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असल्याने तेथे चांगला पाऊस झाला तर त्या भागात लोकांकडे पैसा येईल आणि आपली विक्री वाढेल, असे यामागे गणित असल्याचे त्यांनी सांगितले. ब्ल्यू स्टारच्या ८५ विशेष दालने, ५०० शहरांमधील ४,००० दालनांमधून होणारी विक्री ही बहुतांश तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या श्रेणीतील शहरांमध्ये विखुरलेली आहे. येत्या वर्षांत १०० विशेष दालने विस्तारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

जीएसटीने किमतवाढ

जीएसटी प्रणाली लागू झाल्यास, वातानुकूलन यंत्रे ही बहुतेक २६ ते २८ टक्के कर दराच्या पट्टय़ात घातली जातील. यामुळे वातानुकूलन यंत्रांच्या किमती जवळपास २.५ टक्क्य़ांनी वाढतील, असा त्यागराजन यांनी दावा केला. सर्वाधिक खपाचा उन्हाळ्याचा हंगाम सरल्यानंतर  १ जुलैपासून जीएसटी लागू होईल, ही मात्र दिलासादायी गोष्ट असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.