गेल्या वर्षांप्रमाणे यंदा सलग दुसऱ्या वर्षी ऐन मार्च-एप्रिल या उन्हाळी महिन्यांमध्ये अवेळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीवर जरी संकट ओढवले असले तरी वातानुकूलन यंत्रांच्या (एसी) किमतींनाही अप्रत्यक्षपणे बांध घातला गेला आहे. एसी बाजारपेठेसाठी सर्वाधिक खपाच्या या महिन्यांत बिघडलेल्या ऋतुचक्रामुळे किमती वाढवणे दुरापास्त बनले आहे.

वातानुकूल यंत्रांच्या बाजारात एकूण विक्रीच्या जवळपास निम्मी विक्री मार्च ते मे या तीन महिन्यांत होत असते. बहुतांश उत्पादकांकडून वातानुकूल यंत्रांमध्ये ५० ते ६० टक्के आयात केलेले घटक वापरत असल्याने, केवळ चलनविनिमय मूल्याची जोखीम आणि त्या संबंधाने संरक्षक उपाय (हेजिंग) योजून खूप आधीच आगामी मोसमासाठी किंमत निश्चित करीत असतात. परंतु वरुणराजाची अवेळी बरसण्याची गेली दोन वर्षे सुरू राहिलेली रीत पाहता, विक्रीवर परिणाम होणार नाही हे पाहता यंदाही किमती स्थिरच राहतील, अशी कबुली ब्ल्यू स्टार लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि एसी व्यवसाय विभागाचे अध्यक्ष बी. त्यागराजन यांनी दिली. उन्हाळी मोसमांत ब्ल्यू स्टारच्या उत्पादनांच्या विक्रीचे प्रमाण ४० टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. विक्रीची ही मात्रा कायम राखण्यासाठी कुणीही उत्पादक किमती वाढवतील अशी शक्यता कमीच असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात वातानुकूलन यंत्रांची बाजारपेठ वार्षिक १० टक्के दराने वाढत आहे. २०११ साली उशिराने घरगुती वापराच्या वातानुकूल यंत्र प्रस्तुत करणाऱ्या ब्ल्यू स्टारने मात्र २० टक्क्यांची वृद्धी साधली आहे. सध्या या बाजारवर्गात कंपनीची १० टक्के हिस्सेदारी असून, २०१७ सालात ती १२ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यागराजन यांनी सांगितले. ब्ल्यू स्टारचे एसी यंत्रांचे विविध १३५ मॉडेल्स सध्या देशभरातील ७० ब्रॅण्डेड दालने आणि ३८०० विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. मुंबई-ठाण्यातच ४०० हून अधिक कंपनीचे विक्रेते असले तरी, आपली जवळपास ५७ टक्के विक्री ही महानगरांबाहेरील छोटी शहरे व खेडय़ातच होते असे त्यागराजन यांनी सांगितले. अतिशय वेगाने बाजारपेठ विस्तारत असलेल्या अत्याधुनिक इन्व्हर्टर एसीची ३२ मॉडेल्सची सर्वात व्यापक ब्ल्यू स्टारकडे असून, २०२० साली एकूण विक्रीत त्यांचा ५० टक्के वाटा राहील, असा त्यांचा कयास आहे. ब्ल्यू स्टारने निम्न उत्पन्न गटासाठी एअर कूलर्सचे उत्पादनही सुरू केले आहे, तसेच एअर प्युरिफायर्स या नव्या उत्पादन वर्गातही प्रवेश केला आहे.

‘मेक इन’ प्रयास असले तरी मदार आयातीवरच!

वातानुकूल यंत्राच्या देशी-विदेशी निर्मात्या सर्वानाच ‘कॉम्प्रेसर’ हा महत्त्वाचा घटक आयात करण्याशिवाय गत्यंतर नाही. आजच्या घडीला कोणत्याही वातानुकूलन यंत्रात कॉम्प्रेसरसह एकूण आयात होणारे ५०-६० टक्क्यांच्या घरात जाणारे आहेत. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा परिणाम म्हणून जरी देशांतर्गत उत्पादन सुरू झाले तरी कॉम्प्रेसरच्या आयातीशिवाय गत्यंतर नाही, असे ब्ल्यू स्टारचे त्यागराजन यांनी सांगितले. कॉम्प्रेसर निर्मिती प्रकल्प फायदेशीर ठरावयाचा देशात किमान १० कोटी वार्षिक मागणी मिळायला हवी, भारतात सर्व निर्मात्यांची वार्षिक वातानुकूलन यंत्राच्या विक्रीने आताशी ४ कोटीचा टप्पा गाठला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.