सलग पाचव्या महिन्यात वेतनास विलंब * आर्थिक समस्यांपुढे व्यवस्थापनही हतबल

मुंबई : सलग पाचव्या महिन्यात निर्धारीत कालावधीपेक्षा उशिरा वेतन अदा करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन येत्या आठवडय़ात दिले जाणार आहे. या संकटग्रस्त हवाई सेवेत देशभरात ११ हजारांहून अधिक मनुष्यबळ आहे.

सुमारे ४८,००० कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या देशातील एकमेव सार्वजनिक नागरी हवाई प्रवासी वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना १० दिवस उलटूनही जुलैमधील वेतन मिळालेले नाही. एरवी कंपनी कर्मचाऱ्यांना संबंधित महिन्याचे वेतन महिनाअखेपर्यंत देते. मात्र मार्चपासून कंपनीमार्फत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास विलंब लागत आहे.

जुलै महिन्याचे वेतन आठवडाभरात दिले जाईल, असे कंपनीने शुक्रवारी स्पष्ट केले. कंपनीतील समस्या या आता व्यवस्थापनाच्या हाताबाहेर गेल्या असल्याचे कारण वेतन विलंबाकरिता देण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास विभागाच्या व्यवस्थापकाने याबाबत कर्मचाऱ्यांना पत्र लिहून ही बाब कळविली आहे.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जून महिन्याचे वेतन २ जुलै रोजी मिळाले होते. एअर इंडिया कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी वेतन विलंबाबाबत एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंह खारोला यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

केंद्राकडून नव्याने ९८० कोटी रुपये मिळण्याची एअर इंडियाला प्रतीक्षा आहे. कंपनीवर मार्च २०१७ अखेर ४८,००० कोटी रुपयांचा कर्जभार आहे. मार्च २०२१ पर्यंत कंपनीला ३०,२३१ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याचा वित्तीय आराखडा सरकारने एप्रिल २०१२ मध्येच मंजूर केला आहे. कंपनीला आतापर्यंत समभागाच्या रूपात २७,१९५.२१ कोटी रुपये मिळाले, तर चालू वित्त वर्षांत, जूनपर्यंत ६५० कोटी रुपये मिळाले आहेत.