प्रचंड कर्जभार वाहणारी एकमेव सार्वजनिक प्रवासी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया नवे १,५०० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याच्या तयारीत आहे. अल्प कालावधीसाठीचा हा कर्ज निधी कार्यरत भांडवलाच्या पूर्ततेकरिता खर्च केला जाणार आहे.

एअर इंडिया देशातील एकमेव सार्वजनिक हवाई प्रवासी वाहतूक कंपनी आहे. तिच्यावर ५२,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. एअर इंडियाच्या निर्गुतवणुकीच्या प्रक्रियेला मंत्रिमंडळ समितीने जूनमध्ये मान्यता दिली आहे.

कर्ज उपलब्धतेकरिता बँकांना करण्यात येणाऱ्या आवाहनात एअर इंडियाने नव्या निधी उभारणीची मनीषा व्यक्त केली आहे. याबाबत बँकांनी निविदांच्या रूपात येत्या १२ डिसेंबपर्यंत स्वारस्य दाखविण्याचेही नमूद करण्यात आले आहे. जून २०१८ पर्यंतच्या कालावधीसाठी हे कर्ज असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एअर इंडियाने तिसऱ्यांदा कर्जउभारणीचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये ३२५० कोटी तर ऑक्टोबरमध्ये १५०० कोटी रुपयांचे कर्ज उभारले होते.

एअर इंडियात २०३२ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांचे समभाग भांडवल ओतण्याचे सरकारचे आश्वासन आहे. आतापर्यंत २४,००० कोटी रुपयांचे साहाय्य कंपनीला झाले आहे. मात्र आता पुढील रक्कम निर्गुतवणुकीच्या माध्यमातून      उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.