एअर इंडियाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘स्टार अलायन्स’ या जगातील २६ अग्रेसर हवाई वाहतूक कंपन्यांच्या गटात एअर इंडियाचा समावेश झाला आहे. या समावेशामुळे जगभरातील १३०० हून अधिक ठिकाणी एअर इंडियाची थेट सेवा शक्य होणार असून त्यांच्या महसुलातही पाच टक्क्य़ांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लंडन येथे सोमवारी स्टार अलायन्सच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एअर इंडियाच्या विनंती अर्जावर विचार करण्यात आला. आणि या हवाई वाहतूक कंपनीला सदस्यत्व देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे स्टार अलायन्सचे सदस्यत्व मिळविण्याचा मान मिळवणारी एअर इंडिया ही भारतीय हवाई वाहतूक कंपन्यांपैकी पहिलीच कंपनी ठरली. येत्या ११ जुलैपासून एअर इंडियातर्फे ग्राहकांना सर्व सेवांचा लाभ देण्यात येईल.सन २००७ च्या डिसेंबर महिन्यापासून या सदस्यत्वासाठी प्रयत्न सुरू होते. जुलै २०११ मध्ये इंडियन एअरलाइन्ससह विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली होती. अखेर तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एअर इंडियाचा मार्ग मोकळा झाला.

खासगीकरणाची शक्यता नाही
एअर इंडियाचे खासगीकरण करणार का या प्रश्नास उत्तर देताना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी सध्या तरी तसा विचार नसल्याचे सांगितले. तसेच सध्या ज्या विषयाबाबत काहीही प्रस्ताव नाहीत, त्या विषयावर भाष्य करून हवेत धुरळा उडविण्यात काहीही हंशील नाही, असेही स्पष्ट केले.

नव्या सदस्यत्वाचे फायदे
* जगभरातील १९५ देशांमधील १३२८ विमानतळांवर दररोज २१९८० विमानसेवांचा प्रवाशांना लाभ
* सध्या स्टार अलायन्सकडे संयुक्त मालकीची एकूण ४३३८ विमाने असून त्यातून दरवर्षी ६४ कोटी ग्राहक प्रवास करतात.

एअर इंडियाला मिळणाऱ्या सेवा
* स्टार अलायन्सच्या सदस्यांमध्ये अमेरिकेची युनायटेड, सिंगापूर एअरलाइन्स, लुफ्तान्सा, एअर चायना, एअर कॅनडा, स्विस, ऑस्ट्रियन, ऑल निप्पॉन एअरवेज्, थाई एअरलाइन्स आणि तुर्की एअरलाइन्स अशा विमान वाहतूक कंपन्यांचा समावेश आहे.
* एअर इंडियातर्फे दररोज ४०० विमान फेऱ्यांमध्ये वाढ
* भारतातील ३५ नवीन ठिकाणी सेवा सुरू करणार
* स्टार अलायन्सच्या भारतातील मार्केट शेअरमध्ये १७ टक्क्य़ांची वाढ होऊन, तो ३० टक्क्य़ांवर

एअर इंडियाला हा बहुमान मिळाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. स्टार अलायन्सचे सदस्यत्व मिळणे ही बहुमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केली.