टाटा समूहाचा भारतीय हवाई सेवा क्षेत्रात पुनप्र्रवेश सहज करणाऱ्या एअर एशिया इंडियाने बहुप्रतीक्षित व्यवसायाचे उड्डाण अखेर गुरुवारी दुपारी केले. मलेशियन एअरलाइन्सच्या सहयोगाने सुरू करण्यात आलेल्या कंपनीच्या पहिल्या विमानाने बंगळुरूच्या केम्पेगोवडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोव्यातील पणजीसाठी झेप घेतली. तर परतीच्या प्रवासात ते पणजी ते बंगळुरू असे सव्वा तासात आले.
एअरबस कंपनीच्या ए३२० या विमानाचे सारथ्य इंडिगो आणि किंगफिशरचे माजी वैमानिक राहिलेल्या दोघांनी केले. कॅप्टन मनीष उप्पल व दिगान्ता यांनी दुपारी ३.१० वाजता बंगळुरूतून उड्डाण करत या विमानाचा १८६ प्रवाशांसहचा प्रवास सव्वा तासात पूर्ण केला. परतीच्या प्रवासासाठी ते पणजीच्या दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४.५५ वाजता उडालेही.
कंपनीच्या पहिल्या विमानाने प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी ४० टक्क्यांनी ९९० रुपये या प्रोत्साहनपर तिकीट दरांचा लाभ घेतला. तर ५ टक्क्यांनी ५ रुपये अधिक सवलत दर आणि उर्वरित ६५ टक्के प्रवाशांनी १९०० रुपये भरून तिकिटे खरेदी केल्याची माहिती कंपनीने दिली. अन्य विमानांमध्ये १५ किलो वजनाची बॅग हाताळणे मोफत असताना येथे मात्र शुल्क आकारले गेले.
मलेशियन एअर एशियाचे टोनी फर्नाडिस यांनी यापूर्वीच ‘पहिल्या उड्डाणासाठी आम्ही सज्ज आहोत. विमानाची आसनक्षमता पूर्ण झाली आहे.’ असे ट्विट केले होते. तर एअर एशिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिट्टू शांडिल्य यांनी ‘आमच्या पहिल्या विमान उड्डाणासाठी उत्सुक आहोत’ असे ट्विट उत्तर त्यावर दिले होते.
गेल्या महिन्याच्या अखेरीस उड्डाणाची तारीख व ठिकाण निश्चित करताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिट्टू शांडिल्य यांनी कंपनीचे दर स्पर्धकांपेक्षा तब्बल ३५ टक्के कमी राहतील, असे स्पष्ट केले होते. कंपनीचे बंगळुरू ते चेन्नई उड्डाण १९ जुलै रोजी होणार आहे.
देशातील चौथी किफायती हवाई कंपनी ठरणाऱ्या एअर एशिया इंडियाने वर्षअखेपर्यंत देशातील एकूण नऊ ठिकाणांहून विमान सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये भागीदारीतील हवाई कंपनी सुरू करण्याची घोषणा करून एअर एशियाने तीत ४९%, टाटा सन्सने ३०% व टेलिस्ट्रा ट्रेडप्लेसचे अरुण भाटिया यांनी २१% हिश्शाचे नेतृत्व करण्याचे जाहीर केले होते.