दक्षिणेतून प्रारंभ केल्यानंतर उत्तरेतही शिरकाव करणाऱ्या एअर एशिया इंडियाने आता देशाच्या आर्थिक राजधानीतूनही उड्डाणे सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. एअर एशिया समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नाडिस गुरुवारी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी याबाबत ‘ट्विट’ केले.
अतुलनीय भारतातील मुंबई हे बदलते शहर असून, या महानगरामधून कंपनी आपली सेवा सुरू करेल. आम्ही लवकरच येत आहोत, असे टोनी यांनी म्हटले आहे. याबाबत नेमकी तारीख स्पष्ट करण्यात आली नसली तरी २०१५च्या सुरुवातीला कंपनीची मुंबईतून उड्डाणे सुरू होतील, अशी चर्चा आहे.
एअर एशिया इंडियाने एअरबस ए३२० जातीच्या विमानांद्वारे दक्षिणेत बंगळुरू ते गोवा, चेन्नई, कोची व उत्तरेत बंगळुरू ते चंडीगड, जयपूर हवाईसेवा सुरू केली आहे. माफक दरातील हवाई प्रवास देऊ करणाऱ्या या कंपनीने पहिल्याच महिन्यात ऑगस्टमध्ये स्पर्धक एअर इंडिया, जेट एअरवेजपेक्षा अधिक आसनक्षमता राखली होती. एअर एशिया इंडियामध्ये टाटा समूह व टेलिस्ट्रा ट्रेडचीही भागीदारी आहे.
वाढत्या विमानतळ शुल्कामुळे मुंबई व दिल्ली या महानगरांना वगळेल, असे एअर एशिया इंडियाने म्हटले होते. कंपनीला अद्याप हवाई नियामकाकडून यंदाच्या हंगामाचे वेळापत्रकही बहाल करण्यात आलेले नाही. एअर एशिया इंडियाची भागीदार असणाऱ्या टाटा समूहाची सिंगापूर एअरलाईन्सबरोबरच्या भागीदारातून सुरू होणाऱ्या ‘विस्तार’ने देखील मुंबईसह नऊ शहरांमधून उड्डाण घेण्याची सुसज्जता केली आहे.