21 March 2019

News Flash

मौल्यवान धातूची अक्षय खरेदी : सोने दर आता अधिक चकाकणार..

अमेरिकी फेडरलने २०१७ मध्ये तीनवेळा तर २०१८ मध्ये व्याजदरात एकदा वाढ केली असून आणखी दोन दरवाढ अपेक्षित आहे.

डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्याच्या दरात २०१७ मध्ये सुरू झालेली वाढ २०१८ च्या प्रारंभापासून टिकून आहे. रोख्यांमधील परतावा हा तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर असून जागतिक पातळीवर विकासाचे चित्र व्यापक असल्याने गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सुरू झालेले चक्र वैशिष्टपूर्ण ठरले आहे. अमेरिकी फेडरलने २०१७ मध्ये तीनवेळा तर २०१८ मध्ये व्याजदरात एकदा वाढ केली असून आणखी दोन दरवाढ अपेक्षित आहे.

अमेरिकेने करकपात करताना पायाभुत सुविधांवर मोठय़ा प्रमाणात खर्च करण्याच्या चालविलेल्या तयारीमुळे त्यांची वित्तीय तूट वाढणार असून रोखे बाजारातून आणखी कर्ज उभारले जाईल. फेडरल बँक त्यांचे ताळेबंदपत्रक आटोक्यात ठेवण्याच्या प्रयत्नात असताना रोख्यांचा पुरवठा वाढून रोख्यांच्या परताव्यात वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे या सर्व घडामोडींमध्ये चालूवर्षी चलनवाढ दर आणखी वधारण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात भरारीचे वादळ हळूहळू आकार घेत आहे. अन्य देशांच्या आयात वस्तूंवर आयातकराच्या माध्यमातून निबर्ंध टाकण्याच्या अमेरिकेच्या कृतीमुळे व्यापारयुध्दाची ठिणगी पडली असून आगामी सहा ते नऊ  महिन्यांच्या कालावधीत सोन्याचे दराला बळकटी येणार आहे. व्यापारयुध्द हे प्रत्यक्षात सुरू झाल्यास चलननाढ होऊ न विकासदर घसरण्याची शक्यता असून फेडला आक्रमक धोरणांना वेसण घालावे लागेल. त्यामुळे सोने बाजारासाठी हे घटक केंद्रस्थानी आलेले आहेत.

वस्तूंच्या पातळीच्या मागणीवर भारतात गेल्या दोन वर्र्षांमध्ये वस्तूंची मागणी ही ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमी राहिली आहे. करातील बदल तसेच काही आर्थिक सुधारणांमुळे विविध वस्तूंच्या मागणीत घट झालेली आहे. काही व्यवस्थेतील तर  काही सुधारणावादी बदलांमुळे भारतात सोन्याची मागणी घटलेली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे आणि त्याच्या विविध परिणांमामुळे सोन्याची रोख खरेदी घसरली आहे. भारतात गेले कित्येक वर्षे सोन्याची खरेदी ही प्रामुख्याने रोखीमध्ये होते. सुधारणावादी उपाययोजांमुळे, रोख खरेदीवरील निर्बधांमुळे बहुतांश बचत सोने अथवा स्थावर मालमत्ता खरेदीऐवजी प्रामुख्याने भांडवली बाजाराकडे वळले आहेत. भारतातील सोन्याची मागणी ७५० टन राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतातील सोन्याची मागणी वार्षिक ८०० ते ९०० टन राहिली आहे.

विविध बदलांच्या घटकांमध्ये वस्तू व सेवा करप्रणाली लागू केल्यामुळे सराफ बाजारावर त्याचा मोठा परिणाम झाला. ही करप्रणाली अजून नागरिकांच्या अंगवळणी पडायची असल्याने सोन्याच्या खरेदीत घट झालेली आहे. हा परिणाम आता ओसरताना दिसत आहे. चौथ्या तिमाहीत भारतात सोन्याच्या मागणीत गत वर्षांच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत चार टक्के वाढ होऊ न ती १८९.६०  टनवर आली आहे. २०१७ मधील तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ ५० टक्के असून नव्या करप्रणालीचा अडथळा आता ओसरु लागला आहे. भारतात ही परिस्थिती असताना चीनमध्ये सोन्याची बिस्कीटे आणि नाणांच्या मागणीतील वाढ ही गत पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा वाढली आहे. दागिन्यांच्या खरेदीत चार वर्षांत प्रथमच वाढ झाली असून ती ६४६.९० टन झाली आहे. गतवर्षांच्या तुलनेत यात तीन टक्के वाढ झाली आहे. तेथील आर्थिक विकासाचे चित्र अधिक आशादायक राहण्याची स्थिती असताना चीनने घरांच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी उचलेल्या पावलांमुळे तेथील पैसा हा सोन्यातील गुंतवणुकीकडे वळला आहे.

सोन्याच्या दरातील वाढीबाबत सकारात्मक अंदाज कायम आहे. २०१७ मध्ये सोन्याच्या मागणीने किमान पातळी गाठल्याने निर्माण झालेल्या अस्थितरतेमुळे सोने दरात वाढीसाठी आशादायक वातावरण यापुढे राहणार आहे. दुसरीकडे भांडवली बाजार प्रमाणापेक्षा अधिक उंचावत असल्याने त्यात काही अंशी घसरण अपेक्षित आहे. समभागांच्या किंमतीतील घसरण सोन्यासाठी आशादायक वातावरणच निर्माण करणार आहे. त्याची पहिली झलक फेब्रुवारी—मार्चमध्ये दिसली असून यापुढील काळात चढ-उतार कसे होतील, हे पाहणेही महत्वाचे ठरेल.

मुलभूत घटकांचा विचार करता जागतिक पातळीवर सोन्याची मागणी फिकी राहिली असून २०१६ च्या तुलनेत ती २०१७ मध्ये ७ टक्कय़ांनी कमी होती. दर वाढण्यास कारणीभूत असणारी सोन्यातील थेट गुंतवणूक वार्षिक तुलनेनुसार २३ टक्यांनी कमी आहे. सोन्याचे जगातील सवात मोठे खरेदीदार असलेल्या चीन आणि भारतात ग्राहकांकडून सोन्याला असलेली मागणी वार्षिक तुलनेत वाढलेली आहे. वस्तू रूपात सोन्याच्या मागणीत वाढ व्हायची असली तरी भावनात्मक घटक हे यंदाच्या वर्षांत सोन्याच्या दरात वाढ होऊ शकेल. जागतिक पातळीवर भांडवली बाजारात घसरण होऊ न अस्थितरता आल्यास  सोन्याचे दर आणखी उसळू शकतात. भारतीय बाजारपेठेचा विचार करता यंदाच्या वर्षांत दहा ग्रॅमला २८,८०० ते २९,३०० ही आधारभूत पातळी असून ३२,५०० ते ३३,०० रुपयांच्या पातळीपर्यत सोन्याचे दर उसळू शकतात.

(लेखक मोतीलाल ओसवाल कमॉडिटी ब्रोकर्समध्ये संशोधन विभागाचे उपसंचालक आहेत.)

First Published on April 17, 2018 2:01 am

Web Title: akshay tritiya 2018 purchase of precious metal