देशातील टाळेबंदीचा कालावधी वाढविताना, ई-कॉमर्स क्षेत्राला घरपोच उत्पादने पोहचविण्याची मुभा देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र सर्वच किराणा विक्रेत्यांना घरपोच वस्तू पोहचविण्याची मोकळीक देण्याचा सरकारने अगत्याने विचार करावा, अशी मागणी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (राय)ने गुरुवारी केली.

करोनाच्या फैलावाला प्रतिबंध म्हणून टाळेबंदीत वाढ स्वागतार्ह असली, तरी अर्थचक्राला चालना देण्यासाठी ग्राहकांच्या उंबरठय़ापर्यंत वस्तू पोहचविण्याची सुविधा ही ज्यांना शक्य आहे, अशा सर्वच विक्रेत्यांना खुली करायला हवी. असे केले गेल्यास घराबाहेर पडणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय स्वरूपात कमी करता येईल. शिवाय यातून रोजगाराचे आणि अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा सुरू होऊ शकेल, असे रायने म्हटले आहे.