खासगी बँकांचाही पुढाकार
रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरणातील अर्धा टक्का रेपो कपातीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून तातडीने दर कपात झाली असतानाच आता खासगी बँकांनीही याबाबतीत पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रातील कोटक महिंद्र व येस बँकेने त्यांचे ऋण दर पाव टक्क्यांनी कमी केले.
याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, अलाहाबाद बँक, स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूरनेही त्यांचे किमान ऋण दर कमी केले. कपात करणाऱ्या सर्व बँकांमध्ये सुधारित दरांची अंमलबजावणी ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. किमान ऋण दरात कपातीइतकीच बँकांच्या गृहकर्ज, वाहन कर्ज आणि अन्य ग्राहक कर्जामध्ये कपात होऊ शकेल.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानंतर दोन दिवसांनी कोटक महिंद्र बँकेने ऋण दरात ०.२५ टक्केकपात करीत ते ९.५० टक्के केले. नवीन दर ५ ऑक्टोबरपासून लागू केले जातील, असे बँकेने स्पष्ट केले आहे. बँक तिच्या विविध मुदतीच्या ठेवींवरील दरातही कपात करील, असे मुख्य वित्तीय अधिकारी जैमिन भट यांनी सांगितले.  खासगी क्षेत्रातीलच येस बँकेने पाव टक्के ऋण दर कमी करत ते १०.२५ टक्के केले आहेत. कमी होत असलेल्या दरांमध्ये तूर्त या बँकेचा दर सर्वाधिक आहे.
पतधोरणाच्या दिवशी मंगळवारीच सर्वप्रथम स्टेट बँक, आंध्रा बँक, बँक ऑफ इंडिया यांनी दर कपात जाहीर केली.  बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स यांनी दर कपातीचा धडाका सुरू ठेवला. मात्र खासगी बँकांकडून दर कपात झाली नव्हती. पतधोरणानंतर अ‍ॅक्सिस या एकमेव खासगी बँकेने ऋण दरात कपात केली होती. गुरुवारी मात्र या क्षेत्रातील आणखी दोन बँकांनी दर कमी करीत असल्याचे जाहीर केले. एचडीएफसी बँकेने पतधोरणापूर्वीच ऋण दर ९.३० टक्क्यांवर आणून ठेवले आहेत.
कर्ज-स्वस्ताई
सुधारीत किमान ऋण दर
सरकारी बँका
* स्टेट बँक        ९.३०%
* पंजाब नॅशनल बँक    ९.६०%
* बँक ऑफ बडोदा    ९.६५%
* बँक ऑफ महाराष्ट्र    ९.७०%
* देना बँक        ९.७०%
* अलाहाबाद बँक    ९.७०%
* स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर    ९.७०%
* ओरिएंटल बँक     ९.७०%
* बँक ऑफ इंडिया    ९.७०%
* आयडीबीआय बँक    ९.७५%
* आंध्र बँक        ९.७५%

खासगी बँका :
* आयसीआयसीआय बँक    ९.३५%
* कोटक महिंद्र बँक    ९.५०%
* येस बँक १०.२५%
* अ‍ॅक्सिस बँक    ९.५०%