जून २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत गुंतवणूकदारांनी विविध म्युच्युअल फंड प्रकारांमध्ये १.२४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचे सर्वाधिक लाभार्थी लिक्विड आणि आर्बिटराज फंड ठरले आहेत. करोना आणि टाळेबंदी कालावधीत गुंतवणूकदारांसाठी संबंधित फंडपर्याय आकर्षणाचा ठरला आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (अ‍ॅम्फी) च्या आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीतील ९४,२०० कोटी रुपये फंड गुंतवणुकीतून काढून घेतल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत मात्र १.२४ लाख कोटी गुंतविले आहेत. जूनअखेरच्या  तिमाहीत देशातील ४५ फंड घराण्यांच्या मालमत्तेत १४  टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीतील २२.२६ लाख कोटींच्या तुलनेत मालमत्ता या दरम्यान २५.५० लाख कोटींवर पोहोचली आहे.

गेल्या तिमाहीत सर्वाधिक १.१ लाख कोटी रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात तर २० हजार कोटी, आर्बिटराज फंडात तर ११ हजार कोटी समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतविण्यात आले. निश्चित उत्पन्न रोख्यांत मुख्यत्वे संस्थागत गुंतवणूकदार त्यांच्याकडील रोकड सुलभ रक्कम लिक्विड फंडात गुंतवितात. या तिमाहीत ८६,४९३ कोटी रुपयांची सर्वाधिक गुंतवणूक लिक्विड फंडात झाली आहे. मागील तिमाहीत याच फंड प्रकारातून ९४,१८० कोटी काढून घेण्यात आले होते. खालोखाल बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडात २०,९१२ कोटींची गुंतवणूक झाली.

एप्रिल ते जून ही मागील तिमाही सर्वाधिक व्याजदर कपातीची होती. रिझव्‍‌र्ह बँकेने कोव्हीड-१९ परिणामांवर मात करण्यासाठी केलेल्या व्याजदर कपातीमुळे उच्च पत असलेल्या आणि तुलनेने सुरक्षित रोख्यांत गुंतवणूक करणाऱ्या बँकिंग अँण्ड पीएसयू डेट फंडांच्या परताव्यात वाढ झाली. कमी पत असलेल्या उच्च परतावा असलेल्या क्रेडीट रिक्स फंडात गुंतवणूक केलेल्यांना रोखे अनियमतेमुळे या गुंतवणुकीतील धोका लक्षात आला. परिणामी क्रेडीट रिस्क फंडातून निधीचा ओघ बँकिंग अँण्ड पीएसयू डेट फंडांत झाल्याचे दिसून आले.

– मर्झबान इराणी, निश्चित उत्पन्न गुंतवणूक प्रमुख, एलआयसी म्युच्युअल फंड.