11 August 2020

News Flash

बँकांपाठोपाठ, विमा, नाबार्ड, रिझव्‍‌र्ह बँक कर्मचाऱ्यांनाही भरीव वेतनवाढीची आस

जवळपास १० लाख बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.

संग्रहित छायाचित्र

देशातील सार्वजनिक, विदेशी तसेच खासगी क्षेत्रातील ३५ बँकांचे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनांमध्ये यशस्वी तडजोड होऊन, जवळपास १० लाख बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. नोव्हेंबर २०१७ पासून वेतन सुधारणा लागू होऊन ती ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरू राहील.

देशाला करोना विषाणूजन्य साथरोगाने वेढले असताना वेतनवाढीसंबंध घडून आलेला हा ‘ऐतिहासिक समेट’ असल्याचे भारतीय बँक महासंघ (आयबीए)चे अध्यक्ष सुनील मेहता यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ संघटनांच्या युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन्सनेही वेतनवाढ कराराचे स्वागत केले आहे. तथापि बँक कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर विमा क्षेत्रात भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी, जीआयसी, रिझव्‍‌र्ह बँक कर्मचारी, एक्झिम बँक कर्मचारी तसेच नाबार्ड कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीचे करार बेतले असण्याचा आजवरचा प्रघात आहे. त्यामुळे या बँकेतर वित्तीय सेवा क्षेत्रातील जवळपास २ लाख कर्मचाऱ्यांनाही १५ टक्क्य़ांच्या घरात वेतनवाढीसंबंधी लवकरच तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बँक कर्मचाऱ्यांना विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना ताज्या वेतन करारानुसार, प्रथमच कामगिरीवर आधारीत प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. असा भत्ता खासगी तसेच विदेशी बँकांतील कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचा त्या त्या बँकांच्या व्यवस्थापनांना स्वेच्छाधिकार देण्यात आला आहे. बँकांचा वार्षिक कार्यात्मक तसेच नक्त करोत्तर नफ्याचे प्रमाण किती आणि अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) साठी केलेल्या आर्थिक तरतुदीतून नफ्याचा घेतला जाणारा घास किती यावरून हा कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता ठरणार असून, तो १५ टक्के वाढीच्या अतिरिक्त असेल.

दरडोई सर्वात मोठी वाढ

आधीच्या वाटाघाटीत बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्क्य़ांचीच वाढ मिळाली आणि  एकूण वेतन खर्च ४,७२५ कोटी रुपयांनी वाढला होता. तर यंदा देखील वाढ १५ टक्क्य़ांचीच असली तरी वेतन खर्चातील वाढ मात्र दुप्पट म्हणजे ७,८९८ कोटी रुपयांची आहे. मागील वाटाघाटीचा लाभ हा सेवाज्येष्ठतेत श्रेष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक मिळाला.  ते आता बहुतांश सेवानिवृत्त झाले असून, नव्याने दाखल कर्मचाऱ्यांची मोठी संख्या पाहता, वेतनवाढीचा लाभ अधिकांना आणि दरडोईदेखील मोठा आहे.

–  देवीदास तुळजापूरकर, महासचिव, महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघ

व्यक्तिगत कामगिरीवरही प्रोत्साहन भत्ता हवा!

बँकांच्या कामगिरीवर आधारीत प्रोत्साहन भत्ता आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून लागू होत आहे, हे स्वागतार्हच आहे. त्यातून ज्या बँकांची व्यवसाय कामगिरी वाईट आहे, त्या बँकांतील कर्मचाऱ्यांना अधिक मेहनत तसेच कौशल्य व प्रतिभेने काम करण्याची प्रेरणा मिळेल. पण बँकेच्या कामगिरीबरोबरीने, कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत कामगिरीलाही प्रोत्साहन भत्ता निर्धारीत करताना पाहिले जायला हवे, असे वाटते.

–  सविता कुडतरकर, कॅनरा बँक प्रादेशिक कार्यालयात अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:16 am

Web Title: along with banks insurance nabard rbi employees also expect substantial pay hikes abn 97
Next Stories
1 ‘सेन्सेक्स’कडून पुन्हा ३८,०००चा गड सर
2 किराणा-स्वारस्य
3 सोन्याला तेजीची झळाळी..
Just Now!
X