मुंबई : फ्लिपकार्टच्या खरेदीमुळे अमेरिकी वॉलमार्टला ई-पेठेत भक्कम स्थान निर्माण करता येणार आहे. या क्षेत्रात सध्या तिला स्पर्धक अ‍ॅमेझॉनचे कट्टर आव्हान आहे. वॉलमार्टचे इ-कॉमर्समधील अस्तित्व नगण्य असून अमेरिकी कंपनीला आता फ्लिपकार्टमुळे दोन्ही रिटेल मंचावर आघाडी घेता येणार आहे. दोन भिन्न व्यासपीठावरील रिटेल कंपन्या एकत्र आल्यामुळे इ-कॉमर्समधील फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझॉनमधील दरी आणखी वाढणार आहे.

फ्लिपकार्टसोबतच्या व्यवहारामुळे वॉलमार्टचे सध्याचे १४ टक्के ऑनलाईन वापरकर्ते २०२६ पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत वाढतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर १७ कोटी नवे वापरकर्ते वॉलमार्टबरोबर जोडले जाणार असल्याचेही सांगितले जाते. भारती एंटरप्राइजेसच्या भागीदारीसह वॉलमार्टचा भारतातील व्यवसाय २००७ च्या सुमारास सुरू झाला. वॉलमार्टने मे २००९ मध्ये प्रत्यक्ष दालने सुरू केली.

फ्लिपकार्टच्या विक्रीची चर्चा सुरू झाल्यानंतर अ‍ॅमेझॉनने ६० टक्के हिस्सा तयारी दर्शविली होती. यासाठी अमेरिकी इ-कॉमर्स कंपनी १२ अब्ज डॉलर रक्कम मोजण्यास तयार होती. तुलनेत वॉलमार्टचा  अधिक रकमेचा प्रस्ताव फ्लिपकार्टने मान्य केला.

भारतातील काही अव्वल अधिग्रहण :

* रोसनेफ्ट-एस्सार ऑईल (२०१७) : १२.९० अब्ज डॉलर

* मॅक्स -एचडीएफसी (२०१६) : ९.७३ अब्ज डॉलर

* वेदांता-केर्न इंडिया (२०११) : ८.६७ अब्ज डॉलर

* बीपी-रिलायन्स (२०११) : ७.२० अब्ज डॉलर :

* दायइची सॅन्को-रॅनबॅक्झी (२००८) : ४.६० अब्ज डॉलर

* एनटीटी डोकोमो-टाटा टेलि (२००८) : २.७० अब्ज डॉलर

* अल्ट्राटेक- जेपी असोसिएट्स (२०१६) : २.४० अब्ज डॉलर

* निरमा-लाफार्ज इंडिया (२०१६) : १.४० अब्ज डॉलर