झपाटय़ाने प्रगती करीत असलेल्या ऑनलाइन खरेदीच्या बाजारपेठेतील दमदार वाढीच्या संधींना हेरून, ई-व्यापार क्षेत्रातील महाकाय अमेरिकी कंपनी अ‍ॅमेझॉनने येत्या काळात भारतात ३ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे २०,१०० कोटी रुपयांची) गुंतवणुकीचा मानस असल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्याधिकारी जेफ बेझोज यांनी ही घोषणा केली.
या आधी म्हणजे २०१४ साली घोषित करण्यात आलेल्या २ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त ही आणखी ३ अब्ज डॉलरची वाढीव गुंतवणूक होणार आहे, असे बेझोज यांनी मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या अमेरिका-भारत व्यापार परिषदेच्या (यूएसआयबीसी) व्यासपीठावरून बोलताना स्पष्ट केले. ‘आम्ही भारतात आताच ४५,००० रोजगारांची निर्मिती केली असून, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या आणखी खूप मोठय़ा शक्यता आपल्याला दिसत आहेत,’ असे उद्गारही त्यांनी काढले.
स्नॅपडिल आणि फ्लिपकार्ट या स्पर्धकांच्या कडव्या आव्हानांचा सामना २०१३ साली भारतीय बाजारपेठेत प्रवेश केलेल्या अ‍ॅमेझॉनला करावा लागत आहे. तथापि भारतातील अ‍ॅमेझॉनमध्ये कार्यरत संघ हा निर्धारित महत्त्वाकांक्षी टप्प्यांना खूप आधीच गाठणारी कामगिरी आजवर करीत आला आहे, असे नमूद करून बेझोज यांनी समाधानाचा सूर व्यक्त केला. ‘यूएसआयबीसी’ने प्रदान केलेल्या जागतिक नेतृत्वगुण पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गेल्या दोन वर्षांत यूएसआयबीसीच्या जवळपास २० टक्के सदस्य कंपन्यांनी भारतात २८ अब्ज डॉलरच्या घरात जाणारी गुंतवणूक केली आहे. तर पुढील दोन-तीन वर्षांत आपल्या २० टक्के सदस्य कंपन्यांची भारतातील गुंतवणूक ढोबळ अंदाजानुसार अतिरिक्त ४५ अब्ज डॉलरहून अधिक होईल, असा कयास यूएसआयबीसीचे अध्यक्ष जॉन चेंबर्स यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची आणि महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा राबविण्याची कामगिरी लक्षात घेतल्यास, आम्हाला खात्री आहे की हा गुंतवणुकीचा आकडा लक्षणीय वाढेल किंबहुना दुप्पट होईल, असे चेंबर्स यांनी मत व्यक्त केले.
‘स्टार इंडिया’चीही ५ अब्ज डॉलर गुंतवणूक
ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी फॉक्सची भारतातील उपकंपनी स्टार इंडियाने आगामी तीन वर्षांत भारतात ५ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे ३३,५०० कोटी रुपये) गुंतवणुकीचे नियोजन या बैठकीत स्पष्ट केले. आम्ही भारतातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूकदार कंपनी आणि माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी सध्या आहोतच. पण भारतीय बाजारपेठेतील अमर्याद शक्यता आणखी मोठय़ा गुंतवणुकीला प्रोत्साहित करणारी ठरली आहे, असे या प्रसंगी स्टार इंडियाचे अध्यक्ष व मुख्याधिकारी उदय शंकर यांनी सांगितले.