वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहाराला तोडीस-तोड प्रत्युत्तर

वॉलमार्ट-फ्लिपकार्टच्या एकत्र येण्याला महिना उलटत नाही तोच  त्याला सडेतोड प्रत्युत्तर म्हणून अ‍ॅमेझॉनने आदित्य बिर्ला समूहाचा रिटेल व्यवसाय खरेदी करण्याचा बेत जाहीर केला आहे. बिर्ला समूहातील ‘मोअर’ ही ५०० हून अधिक दालनांची शृंखला ४२०० कोटी रुपयांना खरेदी केली जाणार आहे. अ‍ॅमेझॉन जागतिक गुंतवणूकदार कंपनी सामरा कॅपिटलच्या माध्यमातून हा व्यवहार करत आहे.

वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदीचा व्यवहार गेल्याच महिन्यात पूर्ण केला. थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावरून भारतातील किराणा क्षेत्राने याबाबत आक्षेप घेतला आहे. असे असतानाही अ‍ॅमेझॉनने आदित्य बिर्ला रिटेलमधील ५१ टक्के हिस्सा घेण्याचे निश्चित केले आहे. तर सामराकडे उर्वरित ४९ टक्के भागीदारी असेल.

बिर्ला समूहातील ‘मोअर’ ही दालनसंख्येबाबत देशातील संघटित किरकोळ विक्री क्षेत्रातील चौथी मोठी नाममुद्रा आहे. फ्युचर समूहातील बिग बझार ही नाममुद्रा यात तूर्त अव्वल आहे. तर रिलायन्स रिटेल आणि डी-मार्ट अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.

अ‍ॅमेझॉनने गेल्याच वर्षी शॉपर्स स्टॉपमधील ५ टक्के हिस्सा १८० कोटी रुपयांना खरेदी केला. मात्र स्पर्धक फ्लिपकार्ट व वॉलमार्टच्या एकत्रीकरणाने अ‍ॅमेझॉनपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. अ‍ॅमेझॉनने भारतात ५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे ध्येय राखले आहे. पैकी ३.८४ अब्ज डॉलरची गुंतवणूक आतापर्यंत झाली आहे.

भारतात ‘मल्टी बँड्र रिटेल’मध्ये ५१ टक्क्यांपर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी असल्याने अ‍ॅमेझॉन-बिर्ला व्यवहाराला अडथळा येण्याची शक्यता कमी आहे. भारतात ‘कॅश अँड करी’ अर्थात घाऊक किराणा तसेच अन्य विक्री क्षेत्रात १०० टक्क्यांपर्यंतच्या थेट विदेशी गुंतवणुकीला मुभा आहे.

अ‍ॅमेझॉनबरोबरच्या व्यवहाराद्वारे आदित्य बिर्ला समूहाने भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रातून निर्गमन केले आहे. समूहाने त्रिनेत्र सुपर रिटेल खरेदी करत या क्षेत्रात २००७ मध्ये पदार्पण केले होते. मात्र २०१६-१७ वित्त वर्षअखेर कंपनीला ५५०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान सोसावे लागले. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीचा तोटा कमी झाला असला तरी नव्या व्यवहाराद्वारे कर्जभार काही प्रमाणात कमी करता येणार आहे.

भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठ येत्या दोन वर्षांत ७०० अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तर रिटेल क्षेत्र २०२० पर्यंत १.१ लाख कोटी डॉलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असोचॅमने यापूर्वीच व्यक्त केला आहे. देशातील एकूण किरकोळ विक्री क्षेत्रापैकी तब्बल ९३ टक्के हिस्सा हा आज असंघटित किराणा दुकानांनी व्यापलेला आहे.