देशाच्या बँकिंग व्यवसायात अंबानी, बिर्ला, मित्तल समूह सक्रिय सहभाग नोंदवित असून नव बँकिंग प्रकार असलेल्या पेमेन्ट बँकिंग परवान्यासाठी मुकेश अंबानी, कुमारमंगलम बिर्ला यांनी अखेरच्या क्षणी अर्ज केला आहे.
पेमेन्ट बँक म्हणून ठेवी स्वीकारण्या व्यतिरिक्त अन्य बँकिंग व्यवसायासाठी परवाना मिळविण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली. त्यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, बिर्ला यांच्या आदित्य बिर्ला समूह, सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेल, किशोर बियाणी यांचा फ्युचर समूह, सूक्ष्म वित्त क्षेत्रातील एसकेएस मायक्रोफायनान्स, चलन व्यवहार क्षेत्रातील यूएई एक्स्चेन्ज इंडिया, गृह वित्त क्षेत्रातील दीवाण हाऊसिंग फायनान्स व एस ई इन्व्हेस्टमेन्ट या गुंतवणूक कंपनीने स्वारस्य दाखविले.
रिलायन्सने नव्या छोटय़ा बँकेसाठी सार्वजनिक स्टेट बँकेचे तर भारती एअरटेलने कोटक महिंद्रचे सहकार्य घेण्याचे ठरविले आहे. आदित्य बिर्ला समूह तिच्या आदित्य बिर्ला नुवो लिमिटेडद्वारे किशोर बियाणींच्या फ्युच्यर समूहामार्फत या परवान्यासाठी उत्सुक आहे.
तिसऱ्या फळीतील नव्या बँक परवान्यासाठी अयशस्वी ठरलेल्या वक्रांगी तसेच पेटेक या रक्कम हस्तांतरण क्षेत्रातील कंपनीनेही पेमेन्ट बँकिंगसाठी रिझव्र्ह बँकेकडे अर्ज केला आहे. बँक परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांची एकूण संख्या व अंतिम नावे रिझव्र्ह बँक लवकरच जारी करेल.
रिझव्र्ह बँकेने गेल्याच वर्षी आयडीएफसी व बंधन फायनान्शिअलला पूर्ण बँक व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यांचा व्यवसाय ऑक्टोबर २०१५ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यावेळी या दोन कंपन्यांबरोबरच टाटा समूह, लार्सन अॅन्ड टुब्रो, बजाज समूहानेही अर्ज केला होता. मात्र त्यातील रिलायन्सने यंदा पुन्हा भागीदारीत व्यवसाय करण्यात स्वारस्य दाखविले आहे.