देशात आतापर्यंत होणाऱ्या सर्वात मोठय़ा दूरसंचार ध्वनिलहरी लिलाव प्रक्रियेत अंबानी बंधूंसह भारतातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांच्या दूरसंचार कंपन्याही सहभागी झाल्या आहेत. सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांचा महसूल जमा होणाऱ्या या प्रक्रियेत आठ कंपन्यांनी रस दाखविला आहे.
थोरले बंधू मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ तसेच धाकडे बंधू अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने लिलाव प्रक्रियेत भाग घेतला आहे. याशिवाय भारती एअरटेल, व्होडाफोन, आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलर, मुळच्या नॉर्वेची यूनिनॉर, एअरसेल आणि टाटा समूहातील टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस यांनीही ध्वनिलहरी मिळविण्याकरिता अर्ज केले आहेत.
लहरींच्या आधार किंमती या अधिक असल्याचे कारण देत सिस्टेमा श्याम टेलिसव्‍‌र्हिसेसने मात्र यंदाच्या प्रक्रियेपासून दूरच राहिली आहे. तर व्हिडिओकॉननेही यासाठी उत्साह दाखविलेला नाही. दुसऱ्या पिढीतील (टुजी) आणि तिसऱ्या पिढीतील (थ्रीजी) दूरसंचार ध्वनिलहरी लिलाव प्रक्रिया येत्या ४ मार्चपासून सुरू होणार आहे.
सध्या ध्वनिलहरी परवाने असलेल्या भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर, रिलायन्स टेलिकॉम यांचे परवाने २०१५ -१६ या पुढील आर्थिक वर्षांत संपुष्टात येत आहेत.
आयडिया सेल्युलर ९, एअरटेल ६, तर व्होडाफोन, रिलायन्स टेलिकॉम यांनी प्रत्येकी ७ परिमंडळासाठी नव्याने अर्ज केला आहे.
टुजी व थ्रीजीच्या माध्यमातून सरकारला किमान ८२,३९५ कोटी रुपये मिळणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या प्रक्रियेत सरकारने ६२,१६२ कोटी रुपये मिळविले आहेत.

रिलायन्स सिमेंटचा सहभाग!
कोळसा खाणींच्या ताज्या लिलाव प्रक्रियेत जीएमआर, रिलायन्स सिमेंटसह अनेक कंपन्यांनी भाग घेतला आहे.
रिलायन्स सिमेंटने १,४०२ कोटी रुपये प्रति टनप्रमाणे नऊ खाणींसाठी बोली लावली. तर जीएमआर छत्तीसगड एनर्जीने ओडिशातील कोळसा खाण ४७८ कोटी रुपये प्रति टनप्रमाणे मिळविली आहे. अदानी पॉवर, एस्सार पॉवर, सेसा स्टरलाईट यांनी आठ खाणींसाठी प्रक्रियेत भाग घेतला.
सप्टेंबर २०१४ मध्ये सर्वोच्च  न्यायालयाने २०४ खाणींचा लिलाव रद्द केल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा नव्याने घ्यावी लागत आहे. पहिल्या टप्प्यात १९ खाणींसाठी लिलाव झाला. तर रिलायन्स, अदानी, एस्सार, वेदांता, जीएमआर, आदित्य बिर्ला समूहासाठी सरकारने यापूर्वीच तात्रिक निविदा मंजूर केली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील कोळसा खाणींसाठी झालेल्या लिलावात महाराष्ट्राकरिता बी एस इस्पातला खाण मिळाली आहे. ९१८ रुपये प्रति टन या दराने ही खाण लिलावात मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ताज्या टप्प्यातील कोळसा खाण लिलाव प्रक्रियेचा शेवटची बोली २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी सरकारला १३० प्राथमिक बोली प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये जिंदाल पॉवरने सर्वाधिक २१ खाणींसाठी रस दाखविला होता.
तर अदानी पॉवरने महाराष्ट्रासाठीची बोली दाखल केली होती. तिसऱ्या टप्प्यात सनफ्लॅग आयर्न अ‍ॅन्ट स्टील आणि सीईएसई यांनीही दोन खाणी मिळविल्या आहेत. त्यापैकी एक महाराष्ट्रातील आहे.
हिंदाल्कोच्या माध्यमातून आदित्य बिर्ला समूहाने यंदाच्या कोळसा खाण लिलाव प्रक्रियेत दाखल केलेली बोली मिळविली.