अमेरिका आणि इराणमधल्या तणावाचा शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेच्या एअर स्ट्राइकमध्ये जनरल कासिम सुलेमानीचा झालेला मृत्यू आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकवर कठोर निर्बंध लादण्याची दिलेली धमकी याचा शेअर बाजारावर विपरित परिणाम झाला आहे.

किती लाख कोटीचे नुकसान ?
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८८ अंकांनी कोसळून ४०,६७६ अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३३ अंकांनी कोसळून ११,९९३ अंकांवर बंद झाला. शेअर बाजारावर अमेरिका-इराणमधल्या संभाव्य युद्धाचे सावट आहे. गुंतवणूकदारांच्या तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. धातू, बँका आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्सना आज फटका बसला.

जगातील एकूण तेल उत्पादनापैकी निम्मे तेल उत्पादन पश्चिम आशियामध्ये होते. इराणकडून तेल आयात थांबवल्यामुळे आपण इराक आणि सौदी अरेबियाकडून मोठया प्रमाणावर तेल आयात करतो. कासिम सुलेमानीला इराकच्या भूमिवर संपवण्यात आले आहे. उद्या युद्ध इराकच्या भूमिवर लढले गेल्यास भारताला केल्या जाणाऱ्या तेल आयातीवर निश्चित परिणाम होईल. त्याचा मोठा आर्थिक फटका भारताला बसू शकतो.