दुग्धजन्य पदार्थनिर्मिती लोकप्रिय नाममुद्रा असलेल्या अमूलच्या व्यवस्थापनाने चालू आर्थिक वर्षांत २४,५०० कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य राखले असून वार्षिक तुलनेत ही वाढ तब्बल १८ टक्के असेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

गुजरात को – ऑप मिल्क मार्केटिंग फेडरेशनमार्फत अमूल या नाममुद्रेंतर्गत सहकारी संस्था दुग्धजन्य पदार्थाची विक्री व विपणन देशभरात करते. कंपनीने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत २०,७४० कोटी रुपयांची उलाढाल नोंदविली आहे.
यंदा दुग्धजन्य पदार्थाच्या किंमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ ते ५ टक्के वाढ झाली असून त्यांची मागणीही ग्राहकांकडून वाढली आहे, असा दावा करत २०१५-१६ मध्ये अमूल २४,५०० कोटी रुपयांची उलाढाल नोंदवेल, असे फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनी सांगितले.
फेडरेशन तिचे विपणन जाळे गुजरात व्यतिरिक्त अन्य राज्यात विस्तारित करणार आहे, असे नमूद करून सोधी यांनी फेडरेशन व्यवसाय विस्तार करणार आहे, असेही सांगितले
अमूलमार्फत देशभरात १० विविध प्रकल्प साकारण्यात येणार असून त्यासाठी ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर फेडरेशनची क्षमता प्रति दिन २३० लाख लिटरवरून येत्या दोन वर्षांत ३२० लाख लिटर प्रति दिन करण्यात येणार आहे.