म्युच्युअल फंडात दीर्घ कालावधीकरिता सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)च्या माध्यमातून केलेली गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवू शकते. १८ वर्षांकरिता दरमहा १०,००० रुपयांची ‘एसआयपी’ करून गुंतलेल्या २२ लाख रुपयांचे विद्यमान मूल्य १.३० कोटी रुपये झाले हा याचा प्रत्यय सांगता येईल…

चालू महिन्याच्या ५ एप्रिलपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अ‍ॅसेट फंडाने एक वर्षात ६१.६ टक्के परतावा दिला आहे. तर समान कालावधीत एचडीएफसी मल्टी अ‍ॅसेट फंडाने ५५ टक्के आणि अ‍ॅक्सिस ट्रिपल अ‍ॅडव्हान्टेज फंडाने ५३ टक्के परतावा दिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अ‍ॅसेट फंडाने २००२ मध्ये सुरुवात केली आहे. स्थापनेपासून फंडाने वार्षिक १६.५५ टक्के दराने परतावा दिला आहे.

मल्टी अ‍ॅसेट फंड हे १० ते ८० टक्के समभागसंलग्न गुंतवणूक करतात. तर रोख्यांमध्ये १० ते ३५ टक्के आणि गोल्ड ईटीएफमध्ये १० ते ३५ टक्के तसेच रिट्स, इनविटमध्ये शून्य ते १० टक्क्यांची गुंतवणूक करतात. ही रणनीती विविध मालमत्ता वर्गात विभाजित गुंतवणुकीद्वारे गुंतवणूकदारांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने आखली जाते. यात समभागातील गुंतवणुकीतून फायदा मिळतो तर सोने व अन्य गुंतवणुकीद्वारे स्थिरता मिळते.

या श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या फंडाची उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या फंड्सपैकी एक आहे. एक वर्षात या श्रेणीने ४२.४४ टक्के परतावा दिला आहे. ३ वर्षांत आयसीआयसीआय मल्टी फंडाने १०.०४ तर ५ वर्षांत १४.८ टक्के परतावा दिला आहे. तर एचडीएफसीने ५ वर्षांत ९.८२ आणि अ‍ॅक्सिस ट्रिपलने ५ वर्षांत ११ टक्के परतावा दिला आहे.

समभागांचे मूल्यांकन महागल्यावर ही योजना तेल, सोने, चांदी यांसारख्या कमॉडिटीजमध्ये आपली गुंतवणूक वाढवते, जेणेकरून पोर्टफोलिओचा परतावा चांगला राखला जातो. सद्य:परिस्थितीत अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होत असल्याने या योजनेची समभागांमधील गुंतवणूक जास्त आहे. ३१ मार्च २०२१ अखेर फंडाची समभागसंलग्न गुंतवणूक ७७.७ टक्के राहिली आहे.