उभारीसाठी पाऊल म्हणून ‘जीएसटी’ कपातीची सरकारकडे मागणी

मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून खरेदीदारांनी पाठ केल्याने उत्पादन बंद तसेच रोजगार कपातीचा सामना कराव्या लागत असलेल्या वाहन उद्योगाची स्थिती भयानक असून, चालू वर्षांत एप्रिलपासून या क्षेत्रात साडेतीन लाख लोकांना रोजगार गमवावा लागला असे महिंद्र अँड महिंद्रचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी सांगितले. वस्तू व सेवा करात कपातीसह अधिभार रद्द करण्याची त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.

देशातील आघाडीचा वाहननिर्मिती उद्योगसमूह असलेल्या महिंद्र अँड महिंद्रची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी मुंबईत झाली. सभेत भागधारकांपुढे बोलताना महिंद्र यांनी वाहन उद्योग सध्याची स्थिती भीषण असून, सध्या भयानक मंदीचा तो सामना करत असल्याचे सांगितले.

सर्वच कंपन्यांच्या वाहनांची विक्री महिन्यागणिक घसरत असून या क्षेत्रात यंदाच्या एप्रिलपासून ३.५० लाख रोजगार कपात झाली असल्याचे महिंद्र म्हणाले. मागणीअभावी कंपन्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये उत्पादनात कपात केल्याचेही ते म्हणाले.

वाहनांवरील वस्तू व सेवा कर सरसकट १८ टक्क्यांपर्यंत करून महागडय़ा वाहनांवरील अधिभार कमी करण्यात यावा, असे महिंद्र यांनी सुचविले आहे. सरकारच्या महसुलात वाहन क्षेत्रामार्फत वर्षांला १.८० लाख कोटी रुपये जमा होतात; या क्षेत्रात ३.७० कोटी रोजगार असून वाहन उद्योगाच्या उभारीसाठी त्वरित प्रयत्न सुरू व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.