बँकेच्या खातेदारांची एकमुखी मागणी

मुंबई : पीएमसी बँकेच्या गैरव्यवहारानंतर त्या बँकेचे अध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्जबुडव्या कंपनीच्या प्रवर्तकांना तत्काळ अटक करण्यात आली. मात्र सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादून दीड वर्ष उलटले तरी या बँकेचे अध्यक्ष, संचालक आणि गैरव्यवहाराला जबाबदार व्यक्तींवर अद्याप कारवाई  का करण्यात आली नाही. त्याचबरोबर त्यांची संपत्ती जप्त का केली नाही, असा संतप्त सवाल या बँकेच्या खातेदारांनी शुक्रवारी उपस्थित केला.

खातेदारांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध आगपाखड केली. तसेच शिवसेनेच्या या प्रकरणातील भूमिकेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली.

कर्ज वाटपातील अनियमितता आणि थकलेली कर्जवसुली यामुळे सिटी बँक डबघाईला आली होती. परिणामी रिझव्‍‌र्ह बँकेने हस्तक्षेप करत एप्रिल २०१८ मध्ये ‘३५ अ’कलमानुसार बँकेवर र्निबध लादले. त्यामुळे बँकेचे खातेदार आणि ठेवीदार अशा सुमारे ९१ हजार जणांवर हक्काचे पैसे काढण्यावर मर्यादा आल्या. ठेवीदारांमध्ये मोठय़ा संख्येने जेष्ठ नागरिक आहेत.

सिटी बँकेचे सुस्थितीतील बँकेमध्ये विलनीकरण करावे यासाठी या ठेवीदारांनी वेळोवेळी आंदोलने केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदने दिली. मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. परिणामी खातेदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच निवडणुकीनंतर येणाऱ्या सरकारने खातेदारांना दिलासा दिला नाही, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड खातेधारक आणि भागधारक संघटनेचे चेतन मदन, राजन कुंभारे, अ‍ॅड. सतीश चवाथे यांनी दिला. रिझव्‍‌र्ह बँकेने र्निबध लागू केल्यानंतर सिटी बँकेच्या ११ खातेदारांचा मानसिक धक्क्य़ाने मृत्यू झाला आहे, असा दावाही त्यांनी केला.

बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी अशी मागणीही चेतन मदन यांनी यावेळी केली. त्याचबरोबर शिवसेनेला मराठी माणसांबद्दल संवेदना असतील, तर  अडसूळ आणि त्यांच्या कुटुंबातील बँकेशी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीआधी १० दिवसात सिटी बँकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये विलीनीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप हे आश्वासन पूर्ण केलेले नाही. अडसूळच विलीनीकरणात अडसर बनत आहेत, असा आरोपही खातेदारांकडून करण्यात आला.

तथापि बँकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव जूनमध्येच रिझव्‍‌र्ह बँकेकडे सादर केला आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच बँकेचे विलिनीकरण होईल, असे बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केले.  आपल्यावरील आरोप निधार आणि खोटे आहेत, असेही ते म्हणाले.