दूरसंचार क्षेत्रातून पूर्ण अंग काढून घेणार; गृहनिर्मितीवर भर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्जाचा वाढता भार असलेल्या रिलायन्सचा पसारा कमी करत नेमक्या उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याचा मनोदय रिलायन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी व्यक्त केला आहे. यानुसार बिगर वित्त तसेच दूरसंचार क्षेत्रातून अंग काढून घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील विविध उपकंपन्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी, पुत्र जय अनमोल आदी या वेळी उपस्थित होते. काही उपकंपन्यांच्या पुनर्रचनेचा मानसही अंबानी यांनी बोलून दाखविला.

४०,००० कोटी रुपयांचा कर्जभार असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना अनिल अंबानी यांनी सांगितले की, दूरसंचार क्षेत्रात पुन्हा न येण्याचे आपण निश्चित केले असून उलट स्थावर मालमत्ता क्षेत्रातील संधी घेऊन पाहू. नवी मुंबईतील १३३ एकर जागेवरील धीरुभाई अंबानी नॉलेज सिटीचा उल्लेख करत अंबानी यांनी येथील व्यवहाराद्वारे २५,००० कोटी रुपयांच्या मूल्यनिर्मितीबाबत आशा व्यक्त केली.

अंबानी यांनी दूरसंचार पायाभूतसह फायबर व्यवसाय यापूर्वीच थोरले बंधू मुकेश यांना विकण्याबाबत चर्चा झाली आहे.

म्युच्युअल फंड, जीवन व आरोग्यविमा, दलाली पेढी, गृह वित्त आदी व्यवसाय असलेल्या रिलायन्स कॅपिटलदेखील बिगर वित्त व्यवसायातून बाहेर पडेल, असे अनिल अंबानी यांनी कंपनीच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले. रिलायन्स जनरल इन्शुरन्सची भांडवली बाजारात नोंदणी करणे, रिलायन्स होम फायनान्सकरिता जागतिक भागीदार शोधणे आदी ध्येय येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऊर्जा क्षेत्रातील व्यवसायाचे पुनर्बाधणीकरण करण्याच्या दृष्टीने रिलायन्स पॉवर औष्णिक इंधनावरील प्रकल्पांवर भर देणार असून ऊर्जा क्षेत्रातील परिचलन आणि देखभाल संधीही पडताळून पाहू, असे अंबानी यांनी रिलायन्स पॉवरच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil ambani
First published on: 21-09-2018 at 02:15 IST