नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांचा रिलायन्स एडीएजी समूह आणखी काही कर्जभार कमी करण्याची तयारी करत आहे. यानुसार, २१,७०० कोटी रुपये उभारण्याचा निर्णय समूहाने घेतला आहे. काही स्थावर मालमत्ता तसेच वित्त व मनोरंजन क्षेत्रातील काही हिस्सा समूह विकणार आहे.

समूहाने गेल्या १४ महिन्यांत ३५,००० कोटी रुपये फेडले असल्याचे रिलायन्सने जूनमध्ये स्पष्ट केले होते. रिलायन्स समूहातील प्रामुख्याने चार मोठे क्षेत्र व त्यातील कंपन्यांवर ९३,९०० कोटी रुपयांचा कर्जभार आहे. पैकी २१,७०० कोटी रुपये मालमत्ता व व्यवसाय विकण्याची तयारी रिलायन्स समूह करत आहे.

रिलायन्स समूहांतर्गत येणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे नऊ रस्ते प्रकल्प विकून ९,००० कोटी रुपये उभे करण्यात येणार आहेत. तसेच काही रेडिओ स्टेशन विकून १,२०० कोटी व काही प्रमाणात वित्त व्यवसाय विकून ११,५०० कोटी रुपये जमा करण्याची समूहाची योजना असल्याचे कळते.

रिलायन्स समूहावर सर्वाधिक, ३८,९०० कोटी रुपये कर्ज हे रिलायन्स कॅपिटल या वित्त क्षेत्रातील उपकंपनीवर आहे. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर १७,८०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. रिलायन्स नोव्हल अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग व रिलायन्स पॉवरवर अनुक्रमे ७,००० कोटी रुपये व ३,००० कोटी रुपयांचा कर्जभार आहे.

रिलायन्स समूहातील वाढत्या कर्जामुळे काही उपकंपन्यांचे पतमानांकन काही दिवसांपूर्वी कमी करण्यात आले होते. तसेच उपकंपन्यांच्या हिशेबातूनही काही लेखा परीक्षण कंपन्यांनी अंग काढून घेतले आहे. बाजारात सूचिबद्ध काही कंपन्यांचे समभागमूल्यही गेल्या काही दिवसांमध्ये कमालीचे रोडावले आहे.